‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात विवादास्पद विधाने केल्यामुळे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही बंदी तात्पुरती रद्द करण्यात आली. त्यानंतर राहुलने खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याच्या टीका होत असताना माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने मात्र त्याची पाठराखण केली आहे.

भारतीय संघाने विश्वचषकाचा विचार करायला हवा. इंग्लंडमधील खेळपट्ट्या गोलंदाजीला पोषक असतील हे नक्की. त्यामुळे विश्वचषकात मोठ्या धावसंख्या पाहायला मिळतील. मी जेव्हा युवा संघाबरोबर इंग्लंडमध्ये गेलो होतो, तेव्हा टीम इंडिया जवळपास ३०० धावा करत होती. त्यामुळे विश्वचषकासाठी संघात लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. सध्या तो चांगल्या फॉर्मात नसला, तरीही त्यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. तो प्रतिभावान खेळाडू आहे. त्याचा इंग्लंडमध्ये उपयोग होऊ शकतो, असे द्रविडने म्हणाला.

या आधी पांड्या, राहुल वादावरही द्रविडने त्यांची पाठराखण केली होती. ‘या प्रकरणी लोकांनी राईचा पर्वत करणं थांबवावं. खेळाडूंनी या आधी कधीच चुका केल्या नाहीयेत अशातला भाग नाही. खेळाडूंना मार्गदर्शन केल्यानंतरही भविष्यात अशा चुका होणार नाहीत, असं सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणी आपण खूप बाऊ करू नये, असे द्रविड म्हणाला होता.