नवी दिल्ली : माजी कर्णधार राहुल द्रविड आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची माहिती शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर भारताच्या माजी खेळाडूनेच प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा होती.

४८ वर्षीय द्रविड सध्या बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख असून गेल्या सहा वर्षांपासून भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघांतील बहुतांश खेळाडूंना घडवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. ‘आयपीएल’च्या निमित्ताने दुबईत असलेल्या द्रविडशी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी संवाद साधल्याचे समजते.

‘‘राहुल द्रविडने भारताचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारण्यास होकार दर्शवला आहे. सुरुवातीला तो या भूमिकेसाठी तयार नव्हता, परंतु गांगुली आणि शहा यांच्या विनंतीमुळे द्रविड २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्याचेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले. फलंदाजीचे प्रशिक्षकपद विक्रम राठोडकडे कायम ठेवण्यात येणार आहे.

‘‘रोहितचे वय ३५ असून कोहलीसुद्धा लवकरच ३३ वर्षांचा होणार आहे. त्याशिवाय मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे यांसारखे दर्जेदार खेळाडू त्यांच्या वयाचा विचार करता पुढील २-३ वर्षांच्या कालावधीत निवृत्ती पत्करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंसह संघबांधणी करण्यासाठी द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात येत आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

१७ नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार असून याद्वारेच द्रविड मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार आहे. वर्षांला प्रत्येकी १० कोटी द्रविडला या भूमिकेसाठी मिळणार असल्याचे समजते. मात्र द्रविडची अचानक नेमणूक करण्यात आल्यास प्रशिक्षकाच्या निवडीसाठी आखण्यात आलेल्या प्रक्रियेचे काय, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.

कोहली अनभिज्ञ

दुबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाविषयी ‘बीसीसीआय’ने नेमका कोणता निर्णय घेतला आहे, याची पुरेशी कल्पना नसल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

‘‘मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविडचे नाव चर्चेत असल्याचे मला माहीत आहे, परंतु याविषयी अंतिम निर्णय झाला आहे की नाही, याची मला कल्पना नाही. कोणीही माझ्याशी याविषयी सविस्तर संवाद साधलेला नाही,’’ असे कोहली म्हणाला. यासंबंधी अधिक भाष्य करण्याचे कोहलीने टाळले. मात्र कोहलीच्या वक्तव्यामुळे द्रविडच्या नेमणूकीबाबत चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

धोनीच्या उपस्थितीमुळे आत्मविश्वास उंचावेल!

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंह धोनीची उपस्थितीच आम्हा सर्वाचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी मोलाची ठरेल, असे कोहलीने स्पष्ट केले. ‘‘धोनीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी मला काहीही वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासाठी तो नेहमीच कर्णधार असेल. मात्र कारकीर्दीतील पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंना त्याची उपस्थिती प्रेरणादायी ठरेल,’’ असे कोहली म्हणाला.