भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या द्रविडची २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर नियुक्ती करण्यात आली. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी मालिकेतून तो पदभार स्वीकारेल. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडची घोषणा अपेक्षित होती.

बीसीसीआयच्या मीडिया रिलीझनुसार, “सुलक्षणा नायक आणि आरपी सिंग यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने बुधवारी एकमताने राहुल द्रविडची टीम इंडियाच्या (वरिष्ठ पुरुष संघ) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.” टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर द्रविड म्हणाला, ”भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा मोठा सन्मान आहे आणि या जबाबदारीसाठी मी तयार आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मला आशा आहे, की संघासोबत काम करताना मी ही प्रगती पुढे घेऊन जाईन.”

हेही वाचा – “हो, ते अधिकृत आहे का?” ; मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या नियुक्तीवर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया

”पुढील दोन वर्षात अनेक संघांसह काही मोठ्या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत आणि मी आमच्या क्षमतेनुसार ध्येय साध्य करण्यासाठी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास तयार आहे”, असेही द्रविडने म्हटले. १६४ सामन्यांमध्ये १३,२८८ धावा आणि ३६ शतकांसह सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा द्रविड दुसरा फलंदाज आहे. त्याने ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सुमारे १०,८८९ धावा केल्या आहेत.

द्रविडच्या अर्जानंतर बीसीसीआयला अन्य कोणत्याही अर्जाकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. त्याचे मानधन सुमारे १० कोटी रुपये असेल, जी भारतीय क्रिकेट इतिहासातील कोणत्याही प्रशिक्षकाला दिलेली सर्वाधिक रक्कम आहे. सध्याच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत असल्याने बीसीसीआयने २६ ऑक्टोबर रोजी या पदासाठी अर्ज मागवले होते.