दोन आंतरराष्ट्रीय मास्टर्समधील लढतीत सी. आर. जी. कृष्णाने राहुल संगमाला पराभूत केले. या विजयासह सातपैकी सातही डाव जिंकत येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आघाडी घेतली आहे.
या स्पर्धेत संगमाला डाव गमवावा लागल्याने कृष्णाने स्पर्धेत एका गुणाची आघाडी घेतली. नाशिकच्या अखिलेश नगरेने ५.५ गुणांसह स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान पटकाविले आहे. याशिवाय नाशिकचे अव्वल मानांकित जिगर ठक्कर, अवधूत लोंढे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नाशिकच्या बहुतेक खेळाडूंनी या स्पर्धेत यलो गुणांकनासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे. महाराष्ट्राच्या ऋतुजा बक्षी, संकर्ष शेळके, स्नेहल भोसले, केतन पाटील यांनीही आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. बुधवार हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे.
मंगळवारी आयोजकांच्या वतीने क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन व शंकानिरसनाचे सत्र आयोजित करण्यात आले होते. त्यांनी पालकांना काही सूचना करताना खेळाच्या सरावाबरोबरच योगा व प्राणायाम यांचा सराव केल्यास खेळाडूंना मोठय़ा प्रमाणात फायदा मिळतो, असे नमूद केले. आजचे प्रमुख निकाल पुढीलप्रमाणे- एन. सुरेंद्रन बरोबरी विरुद्ध रवि तेजा, संजीवकुमार बरोबरी विरुद्ध अनुप देशमुख, हेमंत शर्मा विजयी विरुद्ध पंकित मोटा, एन. लोकेश विजयी विरुद्ध ओंकार कळव.