भारतीय संघ 6 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी सामने खेळण्यास सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी भारताचा माजी सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागने मुंबईकर पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुलला आपली पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामन्यांमध्ये याच दोन फलंदाजांनी डावाची सुरुवात करणं योग्य ठरेल असं मत सेहवागने व्यक्त केलं आहे. याचसोबत मुरली विजयला या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सेहवाग म्हणाला.

“माझ्या मते ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी डावाची सुरुवात करायला हवी. दोघेही आक्रमक फलंदाज आहेत, आणि त्यांनी चांगली सुरुवात केली तर भारत मोठी धावसंख्ये उभारु शकतो. जर मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर मी पृथ्वी आणि राहुलला संपूर्ण मालिकेत खेळण्याची संधी दिली असती. मुरली विजयला त्याची संधी मिळालेली आहे, त्यामुळे तो संघाबाहेर बसून वाट पाहू शकतो. राहुल-पृथ्वीपैकी एखादा फलंदाज जर सर्व सामन्यांमध्ये अपयशी झाला तर आगामी मालिकेसाठी मुरली विजयचा विचार नक्कीच करता येईल. ज्या क्षणी तुम्हाला संघातून डावललं जातं त्यावेळी बाहेर तुमची जागा घेण्यासाठी खेळाडू तयार असतात. त्यांनाही योग्य संधी मिळणं गरजेचं आहे. पृथ्वी शॉने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे मुरली विजयला ऑस्ट्रेलियात संधी मिळेल असं वाटत नाही.” Cricbuzz संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता.

अवश्य वाचा – कसोटी सामन्यात पंतऐवजी पार्थिव पटेल यष्टीरक्षक हवा, माजी भारतीय खेळाडूची मागणी

मुरली विजयला इंग्लंड दौऱ्यात मध्यावधीतूनच डच्चू देण्यात आला होता. यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या विंडीजविरुद्ध मालिकेसाठीही मुरली विजयला संघात जागा मिळाली नव्हती. दुसरीकडे लोकेश राहुलसाठीही यंदाचं वर्ष काही चांगलं गेलेलं नाहीये. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये लोकेश राहुलच्या नावावर अवघ्या 420 धावा जमा आहेत. मात्र सेहवागच्या मते लोकेश राहुल आपल्या उणीवांवर काम करुन दणक्यात पुनरागमन करु शकतो. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – लोकेश राहुल स्वतःला बाद करण्याच्या नवीन पद्धती शोधतोय; सहायक प्रशिक्षक संजय बांगर नाराज