आयपीएल लिलावापूर्वी ट्रेडऑफ नावाचा प्रकार असतो. आयपीएल नियमांनुसार, संघ खेळाडूंची अदलाबदल करू शकतात. राजस्थान रॉयल्सने डोनाव्हन फरेरला दिल्ली कॅपिटल्सला देऊन टाकलं होतं. मात्र यंदाच्या हंगामापूर्वी केलेल्या ट्रेडऑफमध्ये त्यांनी नितीश राणाला दिल्लीला दिलं आणि फरेराला पुन्हा ताफ्यात घेतलं. त्याचं मानधनही वाढवलं. ‘डॉन’ टोपणनावाने प्रसिद्ध फरेराचा ट्रेड राजस्थानसाठी फलदायी ठरला आहे. सातत्याने चांगली कामगिरी करत फरेराने घरवापसी योग्य असल्याचं सिद्ध केलं आहे.
२०२३ मध्ये झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने ५० लाख रुपये खर्चून डोनाव्हन फरेरला संघात घेतलं. पण त्यावर्षी फरेराला अंतिम अकरात खेळायची संधीच मिळाली नाही. २०२४ हंगामात त्याने आयपीएल पदार्पण केलं. तो दोन सामने खेळला. गेल्या वर्षीच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात दिल्लीने फरेरासाठी ७५ लाखांची बोली लावत त्याला संघात सामील केलं. दिल्लीने फरेराला अवघ्या एका सामन्यात संधी दिली. वर्षभरात सूत्रं हलली. राजस्थानने नितीश राणाला ट्रेड ऑफ करण्याचा निर्णय घेतला. नितीशला दिल्ली कॅपिटल्स संघाला देत राजस्थानने डोनाव्हन फरेरला परत घेतलं. त्याचं मानधन ७५ लाखांवरून १ कोटी असं करण्यात आलं. हे डील राजस्थान रॉयल्ससाठी एकदम अचूक ठरल्याचं चित्र आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या SA T20 स्पर्धेसाठीच्या लिलावात टेक्सास सुपर किंग्स या संघाने फरेरासाठी प्रचंड बोली लावली होती. आफ्रिकेतल्या डोमस्टिक क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. बॅटिंग,बॉलिंग, फिल्डिंग आणि विकेटकीपिंग असं सबकुछ करू शकणारा फरेरा टी२० प्रकारासाठी उपयुक्त खेळाडू आहे. आफ्रिकेत झालेल्या एका स्पर्धेत फरेराने ८७ धावांच्या खेळीदरम्यान ५ सलग षटकार चोपले होते. आफ्रिकेसाठी टी२० पदार्पणात त्याने २१ चेंडूत ४८ धावांची वेगवान खेळी केली होती.
भारतात खेळण्यासाठी फिरकीविरुद्ध तंत्र घोटीव करण्यावर फरेराने काम केलं. खणखणीत फटकेबाजीसाठी फरेरा ओळखला जातो. यंदाच्या हंगामात दडपणाच्या क्षणी फरेरा सातत्याने उपयुक्त खेळी साकारत आहे. राजस्थानने केलेल्या मोठ्या ट्रेडऑफनुसार संजू सॅमसन चेन्नईकडे गेला. त्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानकडे आले. जडेजा प्रदीर्घ कालावधीनंतर राजस्थान संघात परतला आहे. करन दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. करन नसल्यामुळे फरेराचा संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फरेराने ६९ धावांची दिमाखदार खेळी साकारली होती. हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ३३ धावा केल्या होत्या. ‘फटकेबाजी करताना मेंदू आणि मनात सुस्पष्टता असणं आवश्यक आहे. लहानपणी खेळण्यातला ट्रक चालवताना जी सहजता असते तशी आज होती. पंजाबने मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य दिलं होतं. पण प्रत्येक षटकात १०-१२ धावा केल्या तर हे लक्ष्य पार होऊ शकतं असा विश्वास होता. वैभव-यशस्वी जोडीने चांगली सुरुवात दिली. ध्रुवही चांगलं खेळला. शुभमने दमदार फटकेबाजी करत माझ्यावरचं दडपण कमी केलं. आमची भागीदारी महत्त्वाची ठरली. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. दरवेळी एकच हिरो असू शकत नाही, वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी ओळखून खेळायला हवं. आजच्या फटकेबाजीवर खूश आहे. पंजाबचा संघ उत्तम फॉर्मात आहे, त्यांना हरवल्याचं समाधान आहे’, असं फरेराने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
फरेराला खेळताना पाहिलं की मी मला धोनीची आठवण येते असं एबी डीव्हिलियर्स म्हणाला होता. योगायोग म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्याच मालकीच्या टेक्सास सुपर किंग्स संघाकडून फरेरा खेळतो. १५व्या वर्षी कागिसो रबाडासारख्या भेदक गोलंदाजाला तीन सलग षटकार खेचण्याची करामत फरेराने केली होती. हॉकी आणि रग्बीपटू असल्यामुळे फरेराचं हँडआय कोऑर्डिनेशन उत्तम आहे. तडाखेबंद षटकार मारण्यात पटाईत फरेरा अफलातून क्षेत्ररक्षण करतो.
गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धेतही फरेराची बॅट तळपली होती. संधी मिळत नसल्यामुळे २३व्या वर्षी फरेराने क्रिकेटला रामराम करण्याचा विचार केला होता.आफ्रिकेतल्या टायटन्स आणि ईस्टर्न संघांनी फरेराला करारबद्ध केलं नव्हतं. कामगिरी चांगली असूनही करारबद्ध न केल्याने फरेराने सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होण्याचं ठरवलं होतं. तुझा करार रद्द करत आहोत असा इमेल आला. घरच्यांनीही माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. पण मी क्रिकेट खेळत राहण्याचा निर्णय घेतला असं खुद्द फरेराने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
मंडला मशिंब्यी आणि रिचर्ड दास नेव्हस या प्रशिक्षकांनी फरेराचं मन वळवलं. आठ महिन्यांनंतर फरेरा क्रिकेट खेळायला परतला. तेव्हापासून तो जगभरातल्या टी२० लीगमध्ये खेळतो आहे आणि गोलंदाजांची धुलाई करतो आहे. त्याचा बॅटस्विंग भन्नाट आहे. तो अतिशय सहजतेने षटकार लगावतो असं नेव्ह्स यांनी सांगितलं. सराव सत्रात कसून सराव करतो. त्याने अतिशय कष्टातून स्वत:ला अष्टपैलू खेळाडू म्हणून घडवलं आहे.
प्रशिक्षक संगकारा यांचा पाठिंबा
राजस्थान रॉयल्स संघात परत येण्यात श्रीलंकेचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक कुमार संगकारा यांचा मोलाचा वाटा आहे. संगकारा यांच्या पुढाकारामुळेच फरेरा रॉयल्स संघात परतला आहे असं नेव्ह्स यांनी सांगितलं. आयपीएल कंत्राट मिळाल्यानंतर मायदेशात एका गरजू खेळाडूला फरेराने क्रिकेटचं किट उपलब्ध करून दिलं होतं.
