IPL Points Table Update: गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघातील युवा फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. ११ षटकांच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ८० धावा जोडल्या. यासह मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ विजयापासून २७ धावा दूर राहिला. हा राजस्थानचा सलग तिसरा विजय होता. तर मुंबई इंडियन्सला ३ पैकी दुसरा सामना गमवावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर कोणता संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

राजस्थान रॉयल्सची अव्वल स्थानी झेप

रियान परागच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. ३ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. राजस्थानचा नेट रनरेट +२.४०३ इतका आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघावर विजय मिळवला होता. त्यानंतर गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. आता मुंबई इंडियन्सला पराभूत करून राजस्थानने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे.

पंजाब किंग्जचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. पंजाबने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. तर १ सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे ५ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर २ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दिल्लीने देखील २ पैकी २ सामने जिंकले आहेत. ४ गुणांसह हा संघ चौथ्या स्थानी आहे. २ गुणांसह हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आहे.

लखनौ सुपर जायंट्सने २ पैकी १ सामना जिंकला आहे. यासह २ गुणांसह लखनौचा संघ गुणतालिकेत ६ व्या स्थानी आहे. तर ३ पैकी १ सामना जिंकून २ गुणांसह मुंबईचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ १ गुणासह ८ व्या स्थानी आहे. तर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाला खातं उघडता आलेलं नाही. गुजरात नवव्या तर चेन्नईचा संघ सर्वात शेवटी आहे.