Rajasthan Royals New Owner: राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. रियान परागच्या नेतृत्त्वाखालील संघ सध्या गुणतालिकेत १० सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. यासह आता संघ प्लेऑफच्या दिशेने झटपट पावल टाकत आहे. यादरम्यान आता राजस्थान रॉयल्स संघाला ४० दिवसांत नवे मालक मिळाले आहेत. लक्ष्मी मित्तल आणि आदित्य मित्तल यांनी आदर पूनावाला यांच्यासोबत आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे अधिग्रहण केले आहे. या अधिग्रहणामुळे ते फ्रँचायझीचे नवीन मालक बनतील.
मित्तल कुटुंबाने ३ मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिग्रहणाची माहिती दिली की, आदर पूनावाला यांच्या भागीदारीत मनोज बडाळे आणि त्यांच्या संघाकडून राजस्थान रॉयल्सच्या अधिग्रहणासाठी अंतिम करार झाला आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, मित्तल कुटुंबाला राजस्थान रॉयल्सचा संघ विकत घेण्यासाठी आधीपासूनच रस होता. आपला क्रीडा पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या इच्छेतून त्यांना यात रस निर्माण झाला होता. या अधिग्रहणामुळे, राजस्थान रॉयल्समध्ये मित्तल कुटुंबाकडे ७५ टक्के, तर आदर पूनावाला यांच्याकडे १८ टक्के हिस्सा असेल. उर्वरित ७ टक्के हिस्सा मनोज बदाळे यांच्यासह इतर गुंतवणूकदारांकडे असेल.
राजस्थान रॉयल्स संघाशी जोडल्यानंतर मित्तल कुटुंबीयांनी काय म्हटलं?
लक्ष्मी निवास मित्तल, आदित्य मित्तल, वनिषा मित्तल-भाटिया, आदर पूनावाला आणि मनोज बदाळे हे राजस्थान रॉयल्सच्या संचालक मंडळात सामील होतील. मित्तल कुटुंबाचे राजस्थान राज्याशी घनिष्ठ संबंध आहेत, कारण लक्ष्मी निवास मित्तल यांचा जन्म आणि पालनपोषण उत्तर राजस्थानमधील सादुलपूर गावात झाला. लक्ष्मी निवास मित्तल यांनी म्हटल की त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि त्यांचे कुटुंब राजस्थानचे असल्यामुळे, आयपीएल संघाचा भाग होण्यासाठी राजस्थान रॉयल्सपेक्षा इतर कोणता चांगला संघ असूच शकत नाही. ते म्हणाले की, या महान संघाचा भाग होण्यासाठी ते उत्सुक आहेत.
आदित्य मित्तल म्हणाले की, आयपीएल खूप कमी वेळात जगातील सर्वात मोठ्या क्रीडा लीगपैकी एक बनली आहे आणि राजस्थान रॉयल्स या लीगमधील सर्वात प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. वैयक्तिकरित्या, या महान संघाचा भाग असल्याचा मला खूप सन्मान आणि आनंद वाटतो.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, या गुंतवणुकीसाठी आदित्य मित्तल यांच्यासोबत भागीदारी करत असल्याचा आनंद होत आहे. पूनावाला पुढे म्हणाले, “राजस्थान रॉयल्स ही एक मोठा वारसा असलेली प्रमुख आयपीएल फ्रँचायझी आहे आणि मी या संघाच्या निरंतर वाढीला व दीर्घकालीन यशाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे.”
