पीटीआय, नवी दिल्ली
‘आयपीएल’चा १९वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेतील कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त गटाने राजस्थान रॉयल्स’संघ खरेदीसाठी सुमारे १५,२९० कोटी रुपये (१.६३ अब्ज डॉलर) मोजले आहेत. वर्ष २००८ मध्ये ‘आयपीएल’ची सुरुवात झाली, त्यावेळी सर्वात कमी किमतीला विकला गेलेल्या या संघाला विक्रमी बोली लागली आहे.

सोमानी यांच्या नेतृत्वाखालील या संयुक्त गटामध्ये वॉलमार्ट समूहातील रॉब वॉल्टन आणि फोर्ड मोटर्स कंपनीशी संबंधित हॅम्प कुटुंबाचा समावेश आहे. सोमानी हे ॲरिझोना येथील तंत्र (टेक) क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक असून त्यांनी ‘इंट्राएज’, ‘ट्रुयो.एआय’ (Truyo.Ai) आणि ‘अकॅडेमियन’ यांसारख्या कंपन्या स्थापन केल्या आहेत.

पहिल्याच वर्षी २००८ मध्ये विजेतेपद मिळविणाऱ्या या संघाची खरेदी करण्यासाठी ‘टाइम्स इंटरनेट’, ‘आदित्य बिर्ला ग्रुप’ आणि ‘आर्सेलर मित्तल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य मित्तल यांच्या नेतृत्वाखालील मित्तल कुटुंबीय देखील या शर्यतीत सामील होते. राजस्थान रॉयल्स संघाची ही विक्री ‘बीसीसीआय’च्या मान्यतेनंतर २०२६ च्या हंगामानंतर लागू होईल. सध्या मनोज बदाले यांच्याकडे या संघाचा ६५ टक्के हिस्सा आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,‘‘संघाला मिळणारी किंमत ‘आयपीएल’ हा एक नाममुद्रा म्हणून किती मोठी बनली आहे, याचे द्योतक आहे. वर्ष २०२१ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची ७,००० कोटींना झालेली विक्री पाहता, राजस्थान रॉयल्स संघासाठी मिळालेली ही किंमत कितीतरी पटींनी अधिक आहे. या कराराची अधिकृत घोषणा पुढील चार ते पाच दिवसांत होण्याची शक्यता आहे.’’

सोमानी यांचा क्रीडा क्षेत्रातील वावर नवा नसून टायगर वुड्स आणि रोरी मॅकिलरॉय यांच्या ‘टीजीएल’ गोल्फ लीगशीही सोमानी यांचा निकटचा संबंध आहे. त्याचबरोबर वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांचा मोठा मुलगा रॉब वॉल्टन यांनी यापूर्वी विक्रमी किमतीत एनएफएल संघ ‘डेन्व्हर ब्रॉन्कोस’ची खरेदी केली आहे.

थक्क करणारी आकडेवारी

राजस्थान संघासाठी मोजली जाणारी १५,२९० कोटी रुपयांची (१.६३ अब्ज डॉलर) रक्कम आणि पाठोपाठ विक्रीसाठी सज्ज असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघासाठी अपेक्षित असलेले अंदाजे मूल्य बघितले तर हे आकडे थक्क करणारे आहेत. बंगळूरु संघाचा खरेदी व्यवहार दोन अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.