इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून इतिहास रचला. आपल्या पहिल्याच हंगामात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी ऑरेंज आणि पर्पल कॅप दोन्हीही राजस्थानच्या संघातील खेळाडूंना मिळाल्या आहेत. फलंदाजीमध्ये जोस बटलरने सातत्यापूर्ण खेळी करत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला तर गोलंदाजीमध्ये युझवेंद्र चहलच्या फिरकीची जादू चालली. यावर्षीच्या आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक २७ बळी घेऊन चहलने इतिहास रचला आहे.

युझवेंद्र चहलने आयपीएल २०२२ मध्ये जी कामगिरी केली आहेत ती दुसरा कोणताही फिरकीपटू करू शकला नाही. क्वॉलिफायर २ सामन्यापर्यंत चहल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा यांच्यात पर्पल कॅपसाठी स्पर्धा सुरू होती. दोघांनीही प्रत्येकी २६ बळी मिळवले होते. पण, अंतिम सामन्यात चहलने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला (३४) बाद करून आपल्या खात्यात २७वा बळी जमा केला. त्यामुळे या हंगामातील पर्पल कॅप आणि १५ लाख रुपये बक्षिसाची रक्कम घरी नेण्याची संधी चहलला मिळाली.

चहलने आयपीएल २०२२ मधील १७ सामन्यांमध्ये ५२७ धावा देऊन २७ बळी मिळवले आहेत. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील केवळ दुसरा फिरकी गोलंदाज ठरला. यापूर्वी, २०१०च्या हंगामात डेक्कन चार्जर्सच्या संघाकडून खेळताना फिरकीपटू प्रग्यान ओझाने अशी कामगिरी केली होती. त्याने १६ सामन्यात २१ बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली होती. त्याच्या नंतर आता युझवेंद्र चहलने अशी कामगिरी करून दाखवली आहे.