Rajat Patidar Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिल्यांदाच आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रजत पाटीदार आयपीएल २०२६ स्पर्धेतही दमदार फॉर्ममध्ये आहे. या हंगामातही संघाला गरज असताना त्याने मधल्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. या कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध पार पडला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात आरसीबीचा संघ २५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण आरसीबीला हा सामना ५५ धावांनी गमवावा लागला. सामना जरी गमावला असला तरी रजत पाटीदारने एका मोठ्या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेलला मागे टाकलं आहे.
रजत पाटीदार हा मोठ मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करताना तो जागेवरूनच मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतो. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने षटकारांचा एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्याने सर्वात जलद १०० षटकार मारण्याच्या रेकॉर्डमध्ये ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. त्याने अवघ्या ९३३ चेंडूंचा सामना करत १०० षटकार पूर्ण केले आहेत. तर ख्रिस गेलने ९४३ चेंडूत १०० षटकार पूर्ण केले होते. या स्पर्धेत सर्वात जलद १०० षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा आंद्रे रसेलच्या नावावर आहे. त्याने ६५७ चेंडूत १०० षटकार खेचले होते.
आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० षटकार खेचणारे फलंदाज
आंद्रे रसेल – ६५७ चेंडूत
निकोलस पूरन – ८८४ चेंडूत
रजत पाटीदार – ९३३ चेंडूत
ख्रिस गेल – ९४३ चेंडूत
सुनील नरेन – ९५० चेंडूत
या सामन्यात हैदराबादचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून इशान किशनने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने ५६ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ५१ धावा केल्या. या खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर ४ गडी बाद २५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रजत पाटीदारने सर्वाधिक ५६ धावा केल्या. तर वेंकटेश अय्यरने ४४ धावा केल्या. हैदराबादने हा सामना ५५ धावांनी आपल्या नावावर केला.
