Rajat Patidar Creates History with Record in T20: आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना खेळवला जात आहे. या क्वालिफायर सामन्यात कर्णधार रजत पाटीदारने वादळी फटकेबाजी करत संघाला २५० धावांच्या पलीकडे नेण्यात मोठी भूमिका बजावली. यादरम्यान रजत पाटीदारने टी-२० इतिहासात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आरसीबीने गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात आयपीएलच्या प्लेऑफ इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, कृणाल पंड्या यांच्या वादळी फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने ५ बाद २५४ धावा केल्या. यादरम्यान कर्णधार रजत पाटीदारने नाबाद ९३ धावांची खेळी केली. त्याचं शतक हुकलं असलं तरी त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण धावांचं योगदान दिलं.

रजत पाटीदारने या सामन्यात २८१ च्या स्ट्राईक रेटने ३३ चेंडूत ५ चौकार व ९ षटकारांसह नाबाद ९३ धावा केल्या. यादरम्यान त्याने चौथा षटकार लगावताच २०० धावांचा आकडा पार केला. टी-२० इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये २०० षटकारांचा आकडा गाठणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. या यादीत त्याच्यानंतर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा व रियान पराग हे खेळाडू आहेत. पण रजत पाटीदार सर्वात कमी डावांमध्ये १०५ डावांमध्ये २०० षटकार गाठण्यात यशस्वी ठरला.

सर्वात कमी डावांमध्ये जलद २०० षटकार लगावणारे भारतीय फलंदाज

रजत पाटीदार – १०५ डाव
अभिषेक शर्मा – १२५ डाव
तिलक वर्मा – १२७ डाव
रियान पराग – १३६ डाव

रजत पाटीदार आता आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात कर्णधार म्हणून संयुक्तपणे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद ९३ धावा करून त्याने डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये इतर कोणत्याही कर्णधाराने ९० धावांचा टप्पा गाठलेला नाही.

आयपीएल प्लेऑफमधील कर्णधाराची सर्वोच्च धावसंख्या

९३* धावा: रजत पाटीदार
९३* धावा: डेव्हिड वॉर्नर<br>८७* धावा: श्रेयस अय्यर
८५ धावा: ॲडम गिलक्रिस्ट
७९ धावा: केएल राहुल</p>

रजत पाटीदारचा षटकारांचा अजून एक विक्रम

रजत पाटीदारने या डावात नऊ षटकार लगावत प्लेऑफ सामन्यातील दुसऱ्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला. या यादीत केवळ शुबमन गिल त्याच्या पुढे आहे. त्याने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १० षटकार मारले होते. यासह, त्याने प्लेऑफच्या इतिहासातील आपल्या एकूण षटकारांची संख्याही वाढवली आहे. आता त्याच्या नावावर आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये २४ षटकार आहेत. त्याने हा पराक्रम केवळ सहा डावांमध्ये केला आहे.