Rajat Patidar on RCB IPL Trophy win: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२६ ची चॅम्पियन ठरला. २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर आता गतविजेत्या संघाने यंदा ट्रॉफी आपल्याकडेच कायम ठेवली आहे. ३१ मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून एकतर्फी पराभव केला. आरसीबीचा हा विजय कर्णधार रजत पाटीदारने कोणाला समर्पित केला, जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार रजत पाटीदारने संघाच्या दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाची ट्रॉफी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चाहत्यांना व त्यांच्या कुटुंबांना समर्पित केली. रजत पाटीदारच्या या वक्तव्याने सर्वांची मनं जिंकली. आरसीबीने २०२५ मध्ये पहिलं आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर जल्लोषाचं वातावरण असतानाच चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आनंदाचं वातावरण क्षणात शोकात बदललं.
रजत पाटीदारने कोणाला समर्पित केली आयपीएल ट्रॉफी?
आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात आरसीबीने विविध मार्गांनी त्या ११ चाहत्यांना श्रद्धांजली वाहिली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी संघाने एक मिनिट मौन पाळलं, तसेच काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरला. याशिवाय, खेळाडूंनी सरावादरम्यान ११ क्रमांकाची जर्सी परिधान करून त्या चाहत्यांना आदरांजली वाहिली. तसेच चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ आसनं संपूर्ण हंगामभर रिकामी ठेवण्याचा निर्णयही फ्रँचायझीने घेतला.
दरम्यान, सलद दुसरं आयपीएल विजेतेपद यशस्वीपणे पटकावल्यानंतर रजत पाटीदारने पत्रकार परिषदेत त्या दिवंगत चाहत्यांचा विशेष उल्लेख केला आणि हे विजेतेपद त्यांना समर्पित केलं. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रजत पाटीदार म्हणाला, “हे विजेतेपद आम्ही आमच्या चाहत्यांना समर्पित करतो, फक्त चाहते नाही तर त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित करतो, ज्यांनी गेल्या वर्षीच्या दुर्दैवी दुर्घटनेत आपला जीव गमावला.”
आरसीबीचा कमाल चाहतावर्ग आहे. तब्बल १८ वर्षे संघाला विजेतेपदाची प्रतीक्षा करावी लागली, पण चाहत्यांनी कधीही साथ सोडली नाही. प्रत्येक चढ-उतारात ते संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गुजरात टायटन्सविरुद्धची अंतिम लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आली होती. मात्र, तिथेही आरसीबीच्या चाहत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. विजयानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी या निष्ठावान चाहत्यांचे विशेष आभार मानले.
विराट कोहली म्हणाला, “मी नेहमी म्हणतो की आमच्यासाठी फक्त सात घरच्या मैदानावरील सामने नसतात, तर चौदाही सामने घरच्या मैदानावरच असतात. आम्ही कुठेही खेळायला गेलो तरी आमचे चाहते तिथे उपस्थित असतात आणि संघाला पाठिंबा देतात. आज गुजरातचं होम ग्राउंड असला तरी स्टेडियममधील जवळपास ९० टक्के प्रेक्षक आरसीबीचे चाहते असल्यासारखं वाटत होतं.हे नातं आम्ही अनेक वर्षांत निर्माण केलं आहे. त्यांना अभिमान वाटावा, यासाठी आम्ही नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करत राहू. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी अमूल्य आहे. आज ते आमच्यासोबत हा विजय साजरा करू शकले आणि आम्हाला ट्रॉफी उंचावताना पाहू शकले, याचा खूप आनंद आहे.”
रजत पाटीदारनेही या ऐतिहासिक विजयाचं श्रेय चाहत्यांनाच दिलं. “आरसीबीच्या चाहत्यांनो, हा विजय पुन्हा एकदा तुमच्यासाठीच आहे. ‘ई साला नू कप नमदू!’” असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
