२०२१ मध्ये रजत पाटीदारचं आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न साकार झालं. विराट कोहलीच्या नेतृत्वात रजतने पदार्पण केलं. हा प्रवास आता सलग सुरू राहील असं रजतला वाटलं होतं पण पुढच्याच वर्षी त्याला दणका बसला. २०२२ लिलावात रजतचं नाव होतं. आरसीबी किंवा कोणताही संघ आपल्याला ताफ्यात समाविष्ट करेल असं रजतला वाटलं होतं. लिलावाची मूळ प्रक्रिया झाली. अॅक्सीलरेटेड ऑक्शन झालं. मात्र रजतला घेण्यात कोणत्याच संघाने स्वारस्य दाखवलं नाही. रजतासाठी हा मोठा आघात होता. त्याला वाईट वाटणं साहजिक होतं. पण त्याने हार मानली नाही.
मध्य प्रदेशात डिव्हिजन क्रिकेट खेळत राहिला. आयपीएलचा भाग नसल्याने रजतच्या घरच्यांनी लग्नाची तारीख ठरवली. ९ मे रोजी त्याचं लग्न होणार होतं. ‘छोटेखानी सोहळा होता त्यामुळे निमंत्रण पत्रिका छापल्या नाहीत. फारच कमी लोकांना बोलावलं होतं. इंदूरमधलं एक हॉटेल बुक केलं होतं; असं रजतच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं. ‘आयपीएलमधून बोलावणं आलं आणि तिथे जाणं आवश्यक होतं. रजतने उशिरा का होईना मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आम्हा सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटला. मध्य प्रदेशचा कर्णधार म्हणून असलेल्या जबाबदारीनंतर जुलै महिन्यात त्याचं लग्न झालं’, असं त्यांनी सांगितलं. रजत आणि गुंजनचं यथावकाश लग्न झालं. त्यांना मुलगा आहे.
२०११ मध्ये रजतने आरसीबीसाठी खेळताना आयपीएल पदार्पण केलं. त्यावर्षी त्याला चारच सामन्यात संधी मिळाली. २०२२ लिलावात तो अनसोल्ड ठरला. हंगामाच्या मध्यात लुवनिथ सिसोदिया दुखापतग्रस्त झाल्याने रजतला संघात घेण्यात आलं. याच हंगामात प्लेऑफमधल्या एलिमिनेटर सामन्यात रजतने लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध ५४ चेंडूत १२२ धावांची अफलातून खेळी साकारली. या खेळीने रजत प्रकाशझोतात आला. हंगामाच्या उत्तरार्धात संधी मिळूनही रजतने ८ सामन्यात १५२च्या स्ट्राईकरेटने ३३३ धावा चोपून काढल्या आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
हा फॉर्म कायम राखण्याची रजतची इच्छा होती मात्र नियतीच्या ते मनात नव्हतं. २०२३ हंगामात पायाला झालेल्या दुखापतीमुळे रजत संपूर्ण हंगामात एकही सामना खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. याचा वचपा रजतने २०२४ हंगामात काढला. १५ सामन्यात १७७च्या स्ट्राईकरेटने खेळताना रजतने ३९५ धावा केल्या. यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश होता.
२०२५ हंगामासाठी आरसीबीने रजतचीच कर्णधारपदी नियुक्ती केली. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीने २०२३ मध्ये कर्णधारपद सोडलं होतं. फाफ डू प्लेसिसने तीन वर्ष कर्णधारपद भूषवलं. आरसीबीचा पुढचा कर्णधार कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. संघव्यवस्थापनाने शांत, कमी बोलणाऱ्या रजतकडे संघाची धुरा सोपवली. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असतानाही रजतने १५ सामन्यात १४३च्या स्ट्राईकरेटने ३१२ धावा केल्या. रजतच्या नेतृत्वात आरसीबीने पहिल्यावहिल्या जेतेपदाला गवसणी घातली.
२०२६ हंगामात रजतच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आरसीबीला जेतेपदाच्या उंबरठ्यावर नेलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल १० मध्ये आहे. क्वालिफायरच्या महत्त्वपूर्ण लढतीत रजत एकाक्षणी १४ चेंडूत १० वर खेळत होता. खेळपट्टीचा नूर कसा आहे, प्रतिस्पर्धी संघाच्या माझ्यासाठी काय योजना आहेत हे जाणून घेण्यासाठी मी काही चेंडू घेतो. स्थिरावल्यानंतर मोठे फटके खेळतो असं रजतने सांगितलं. रजतच्या ३३ चेंडूत नाबाद ९३ धावांच्या खेळीने आरसीबीचा विजयाचा पाया रचला.
दिग्गजांना जे जमलं नाही ते रजतने करून दाखवलं
आरसीबीला महान खेळाडूंच्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. राहुल द्रविड, केव्हिन पीटरसन, अनिल कुंबळे, डॅनियल व्हेटोरी, विराट कोहली, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस या मोठ्या खेळाडूंना जमलं नाही ते रजतने कर्णधार म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्याच हंगामात करून दाखवलं. १८व्या हंगामात आरबीसीने जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. आयपीएल स्पर्धा यशस्वी होण्यात विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. विराटने २०११ ते २०२३ एवढ्या प्रदीर्घ कालावधीत १४३ सामन्यात आरसीबीचं नेतृत्व केलं. पण विराटच्या नेतृत्वात आरसीबीला जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. रजतने कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात जेतेपदावर कब्जा केला. अर्थात
नेतृत्व ही रजतसाठी नवी गोष्ट नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रजत मध्य प्रदेशचं नेतृत्व करतो.
मध्य प्रदेश संघाचा आधारवड
२०१५-१६ हंगामात रजतने मध्य प्रदेशसाठी पदार्पण केलं. पदार्पणातच शतक झळकावण्याचा विक्रम रजतच्या नावावर आहे. सात वर्षानंतर रजतने कारकिर्दीतलं आणखी एक मानाचं शतक झळकावलं. २०२२ रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये रजतने शतकी खेळी साकारली. तब्बल ६९वर्षांनंतर मध्य प्रदेश संघानेर रणजी करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. या जेतेपदात रजतच्या फलंदाजीचा आणि नेतृत्वाचा सिंहाचा वाटा होता.
२०२३ मध्ये रजतने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी रजतने कसोटी पदार्पणही केलं. ३ कसोटीत रजतला लौकिकाला साजेसा खेळ करता न आल्याने तो संघाबाहेर फेकला गेला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात रजतने ४४.०७च्या सरासरीने ५५०९ धावा केल्या आहेत. यामध्ये १६ शतकं आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.
शुभम शर्माचा सल्ला आला कामी
हंगामाच्या मध्यात आरसीबीकडून बोलावणं आल्याने रजत विचारात पडला. लिलावात अनसोल्ड गेल्याने तो नाराज होता. त्याचं लग्नही ठरलं होतं, होणारही होतं. अशा वेळी आरसीबी व्यवस्थापनाकडून कॉल आला. ‘मित्रा, तुला जायला हवं. तुला खेळायची संधी नक्की मिळेल. बाकी विचार सोड आणि बंगळुरू गाठ’, असा सल्ला मित्र आणि मध्य प्रदेशचा माजी कर्णधार शुभम शर्माने रजतला दिला. रजतने शुभमचा सल्ला ऐकला आणि तो बंगळुरूला रवाना झाला.
आयपीएलविजेता कर्णधार पण अजूनही भारतासाठी टी२० पदार्पण नाही
२०२१ हंगामापासून रजत आरसीबी संघासाठी खेळतो आहे. जवळपास दशकभर तो मध्य प्रदेशसाठीही टी२० खेळतो आहे. रजतच्या नेतृत्वात आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं. यंदाही दमदार खेळ करत आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून रजतने स्वत:ला सिद्ध केलं आहे मात्र अजूनही तो भारतासाठी टी२० खेळलेला नाही. अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवडसमिती रजतच्या कामगिरीच्या दखल घेऊन त्याला संधी देतील अशी चाहत्यांना आशा आहे.
