Rajat Patidar Statement on RCB Win: आरसीबीने मुंबई इंडियन्सचा अखेरच्या चेंडूवर २ विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचा संघ १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना फक्त १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीला १६७ धावा करत मुंबईच्या गोलंदाजीपुढे फार कष्ट घ्यावे लागले आणि अखेरीस आरसीबीने बाजी मारली. पण रजत पाटीदारने सामन्यानंतर केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं.
सामन्यातील अखेरच्या चेंडपर्यंत सामना कोण जिंकणार हे निश्चित नव्हतं, त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या सामन्यावर नजरा खिळल्या होत्या. रजत पाटीदारला सामन्यानंतर विचारण्यात आलं की, तुझी ह्रदयाची धडधड कशी आहे आता, यावर उत्तर देताना रजत म्हणाला, “आता नॉर्मल आहे. पुढे म्हणाला, “आता अशा प्रकारचे सामने जणू सामान्यच वाटू लागले आहेत. पण एकूण हा अतिशय चुरशीचा आणि शानदार सामना होता, विशेषतः केपी म्हणजेच क्रुणाल पंड्याने संघासाठी अप्रतिम कामगिरी केली.”
आज त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय कुणाचा होता? यावर बोलताना रजत म्हणाला, “हा आमचा सामूहिक निर्णय होता. संघ बैठकीत यावर चर्चा झाली होती. याआधीही त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आम्हाला त्याला पुन्हा ती संधी द्यायची होती आणि त्याने ती संधी उत्कृष्टरीत्या साधली. अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच मोठ्या सामन्यांमध्ये आणि दबावाच्या परिस्थितीत असे खेळाडू संघासाठी उभे राहतात.”
रजत पाटीदारचं आरसीबीच्या विजयानंतर मोठं वक्तव्य
“भुवनेश्वरबद्दल बोलायचं झालं तर, त्याने चेंडूवर ठेवलेलं नियंत्रण अप्रतिम होतं. गती आणि अनियमित उसळी असलेल्या विकेटवर त्याच्या गोलंदाजीविरूद्ध खेळणं खूप कठीण होतं,” भुवीबद्दल कर्णधार रजत पाटीदार म्हणाला.
“सध्या आम्ही गुणतालिकेकडे फार लक्ष देत नाही. आमचा भर स्वतःच्या ताकदीवर आणि चांगलं क्रिकेट खेळण्यावर आहे. गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघाला १६६ धावांवर रोखणं खूप महत्त्वाचं होतं आणि खरं सांगायचं तर ते लक्ष्य सहज गाठण्यासारखं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला वाटत नाही की आम्ही हा सामना जिंकण्याचे हकदार आहोत. आमच्या फलंदाजीच्या ताकदीचा विचार करता, हे लक्ष्य आम्ही सहज गाठायला हवं होतं,” कर्णधार रजत पाटीदारच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
मुंबईने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात खूपच खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कल १२ धावा, कर्णधार रजत पाटीदार ८ धावा तर जेबक बेथल २७ धावांचं योगदान देत बाद झाले. यानंतर कृणाल पंड्याने संघाचा डाव एकहाती सावरत पायात क्रॅम्प येत असतानाही उत्कृष्ट खेळी केली. कृणालने ४६ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने १८ धावांचं योगदान दिलं. अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारने मारलेला षटकार मॅचविनिंग ठरला.
