Rajat Patidar Stunning Catch To Dismiss Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये पार पडलेल्या या सामन्यात ईस्ट झोनला तिसऱ्या दिवशी विजयासाठी अवघ्या १५९ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ईस्ट झोन संघाने ४ गडी राखून पूर्ण करत स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ४० धावांची खेळी केली. हे वादळ रोखण्यासाठी रजत पाटीदारने भन्नाट कॅच घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात १५९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने टी-२० स्टाईल फटकेबाजी करून दमदार सुरुवात करुन दिली. दरम्यान सेंट्रल झोन संघाकडून १४ वे षटक टाकण्यासाठी मध्यमगती गोलंदाज यश ठाकूर गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार खेचला, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवरही त्याने चौकार खेचला.
रजत पाटीदारचा भन्नाट कॅच
सुरुवातीच्या ४ चेंडूंवर चौकार- षटकारांचा पाऊस पाडल्यानंतर पाचव्या चेंडूवर यश ठाकूरने दमदार पुनरागमन केलं आणि पाचवा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर षटकातील शेवटच्या चेंडूवरही वैभवने हल्ला चढवत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडू उंच गेला पण हव तितका लांब गेला नाही. त्यामुळे झेल घेण्याची संधी निर्माण झाली. मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रजत पाटीदारने ३० मीटर मागे धावून डाईव्ह मारुन अविश्वसनीय कॅच घेतला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सेंट्रल झोन संघाने २६६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ईस्ट झोन संघाचा डाव देखील २६६ धावांवर आटोपला. ईस्ट झोन संघाकडून फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर अभिमन्यू ईश्ववरनने ६९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सेंट्रल झोन संघाचा डाव १५८ धावांवर आटोपला. ईस्ट झोन संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ईस्ट झोन संघाने ४ गडी राखून जिंकून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
