रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचं रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक ६३७ बळी टिपले. इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप ६०० बळींचा टप्पा गाठता आलेला नाही. गोयल यांनी रणजी क्रिकेट गाजवले, पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात २५ पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा १५ वेळा केला. हरयाणाच्या गोयल यांनी १५७ सामने खेळले. ५५ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी ५९ वेळा एका डावात ५ बळी तर १८ वेळा एका सामन्यात १० बळी टिपण्याची किमया साधली. त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत १,०३७ धावाही केल्या. ते पतियाळा, पंजाब आणि दिल्ली या संघांकडून क्रिकेट खेळले.

BCCI सह काही माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

गोयल यांच्या निधनाने एक महान लेग-स्पिनर भारताने गमावल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली.