आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील राजीनामा सत्र सुरूच राहिले आहे. चिटणीस संजय जगदाळे व खजिनदार अजय शिर्के यांच्या राजीनाम्यानंतर आता आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन यांना पोलिसांनी स्पॉटफिक्सिंग प्रकरणी अटक केल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी झाली मात्र अद्याप त्यांनी पदाचा त्याग केलेला नाही. त्यांच्यावर दडपण आणण्यासाठी मंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्ला यांनीही येथे शनिवारी राजीनामा दिला.
शुक्ला म्हणाले, गेले काही दिवस मी या संदर्भात विचार करीत होतो. जगदाळे व शिर्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे असे मानून मी माझा राजीनामा बीसीसीआयकडे पाठविला आहे.