scorecardresearch

रमेश पोवारची निवृत्ती

फिरकी गोलंदाज रमेश पोवारने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला.

फिरकी गोलंदाज रमेश पोवार
फिरकी गोलंदाज रमेश पोवार

मास्टर्स क्रिकेट लीग खेळण्याच्या इराद्याने निर्णय
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या पावलांवर पाऊल टाकत मास्टर्स क्रिकेट लीग (एमसीए) खेळण्याच्या इराद्याने फिरकी गोलंदाज रमेश पोवारने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला. गुजरातकडून रणजी खेळणाऱ्या पोवारचा हा अखेरचा स्थानिक क्रिकेटचा हंगाम असणार आहे.
‘‘गेली दोन वष्रे निवृत्तीचा विचार मनात डोकावत होता. मागील वर्षी कामगिरी चांगली झाल्याने निर्णय घेण्याची घाई केली नाही. पण या वर्षी मात्र आता थांबायला पाहिजे, याची जाणीव झाली. याच वेळी माझ्याच वयाच्या क्रिकेटपटूंसाठी मास्टर्स क्रिकेट लीगचा प्रस्ताव समोर होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली,’’ असे पोवारने सांगितले.
‘‘निवृत्तीचा निर्णय हा खरेच आव्हानात्मक असतो. भावनिकतेचे आव्हान जपून व्यावहारिक पद्धतीनेही विचार करावा लागतो आणि त्यानंतरच हा निर्णय पक्का करता येतो,’’ असे पोवार या वेळी म्हणाला. दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असणाऱ्या पोवारने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई, राजस्थान आणि गुजरातचे प्रतिनिधित्व केले. ऑफ-स्पिन गोलंदाजी हे वैशिष्टय़ जपणारा पोवार म्हणाला, ‘‘ही एक कला आहे. त्यासाठी मी अथक मेहनत केली आहे. मी क्रिकेटसाठी भारतभर फिरलो आहे. माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे माझे ध्येय आहे. घडणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करून चांगले ऑफ-स्पिनर देशात निर्माण करण्यासाठी बांधील राहीन.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘मुंबई क्रिकेटने आम्हाला ओळख, पैसा आणि नाव दिले आहे. ते आमच्या पाठीशी सदैव असते. या सर्व निवृत्त क्रिकेटपटूंचा मुंबई क्रिकेट असोसिएशनने योग्य उपयोग करून घ्यावा. नीलेश कुलकर्णी, अजित आगरकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे मुंबईच्या उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करून देता येईल.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2015 at 01:51 IST

संबंधित बातम्या