भारताच्या संघात स्थान मिळविण्याची क्षमता असलेल्या विजय झोलने पदार्पणातच नाबाद द्विशतक झळकावले. त्याच्याबरोबरच हर्षद खडीवाले यानेही शतक ठोकले. त्यामुळेच महाराष्ट्राने त्रिपुराविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात ३ बाद ४६० धावा केल्या. उर्वरित खेळांत त्रिपुराने दुसऱ्या डावात १ बाद २८ धावा केल्या.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्रानेच वर्चस्व गाजविले. त्रिपुराने पहिल्या डावात केलेल्या ३०४ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राने पहिल्या डावात ३ बाद ४६० (घोषित) धावा करीत १५६ धावांची आघाडी मिळविली. महाराष्ट्राने १ बाद १३३ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. जालना येथील रहिवासी असलेल्या झोल याने खडीवाले, केदार जाधव व अंकित बावणे यांच्या साथीत शतकी भागीदारी रचल्या. १९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व करणारा झोलचा हा पहिलाच रणजी सामना आहे.
झोल व खडीवाले यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. खडीवाले याने १३ चौकार व एक षटकारासह ११२ धावा केल्या. डावखुरा खेळाडू झोल याने त्यानंतर जाधवच्या साथीत ११० धावा जमविल्या. जाधवने चार चौकारांसह ५७ धावा केल्या. झोल याने बावणे याच्या साथीत १११ धावांची अखंडित भागीदारी केली. झोलचे द्विशतक पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राने डाव घोषित केला. झोलने रणजी पदार्पणाचे कोणतेही दडपण न घेता नाबाद २०० धावा केल्या. त्यामध्ये त्याने १९ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. बावणे याने आक्रमक खेळ करीत नाबाद ५४ धावा टोलविल्या.
सामन्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्यामुळे त्रिपुराचा डाव लवकर गुंडाळल्यास महाराष्ट्राला निर्णायक विजयाची संधी आहे. उर्वरित एक तासाच्या खेळांत त्रिपुराने के.बी.पवन याची विकेट गमावली. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या सचिन चौधरी याने त्याला बाद केले.
संक्षिप्त धावफलक
 त्रिपुरा ३०४ व १ बाद २८ महाराष्ट्र पहिला डाव ३ बाद ४६० घोषित (हर्षद खडीवाले ११२, विजय झोल नाबाद २००, केदार जाधव ५७, अंकित बावणे नाबाद ५४)