लखनऊ : कर्णधार देवदत्त पडिक्कलच्या (३३० चेंडूंत २३२) शानदार द्विशतकी खेळीच्या जोरावर रणजी उपांत्य फेरीत उत्तराखंडविरुद्ध आधीच धावांचा डोंगर उभ्या केलेल्या कर्नाटकची वाटचाल आता विशाल धावसंख्येकडे सुरू आहे. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्नाटकने पहिल्या डावात ६ बाद ६८९ धावांची मजल मारली होती.
फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर पडिक्कलने दुसर्या दिवशी आपल्या शतकी खेळीचे द्विशतकात रुपांतर केले. कारकीर्दीत पडिक्कलचे प्रथम श्रेणीतील हे पहिलेच द्विशतक ठरले. पडिक्कलने ३३० चेंडूंत २९ चौकार आणि तीन षटकारांसह आपली २३२ धावांची खेळी सजवली. प्रथम राहुल आणि नंतर रविचंद्रन स्मरण यानेदेखील शतकी खेळी करून उत्तराखंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. स्मरणने १९१ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद १२१ धावा केल्या.
पहिल्या दिवसअखेरच्या २ बाद ३५५ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केल्यावर पडिक्कल आणि करुण नायर या नाबाद जोडीने कर्नाटकचा डाव त्याच आत्मविश्वासाने पुढे नेला. हंगामात फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या करुणने दुसर्या् दिवशी १०५ चेंडूंत ६० धावांची खेळी करताना पडिक्कलच्या साथीत १२९ धावांची भागीदारी केली.
करुण बाद झाल्यानंतर पडिक्कलने आपले द्विशतक साजरे केले. त्याला स्मरणकडून चांगली साथ मिळाली. मात्र, स्मरणच्या साथीत ५९ धावा जोडल्यानंतर पडिक्कल बाद झाला. पाठोपाठ श्रेयस गोपालही शून्यावर परतला. मात्र, या यशाचा फायदा उत्तराखंडच्या गोलंदाजांना उठवता आला नाही. स्मरणला २२ वर्षीय आक्रमक फलंदाज कृतिक कृष्णाने (६०) सुरेख साथ केली. या जोडीच्या १२३ धावांच्या भागीदारीने कर्नाटकची धावसंख्या वाढण्यास मदत झाली.

