घरच्या मैदानावर झारखंड आणि ओडिशा संघांविरुद्ध सुमार कामगिरीमुळे विजयाची संधी गमावलेल्या मुंबई संघाचा आता बलाढय़ कर्नाटकशी मुकाबला रंगणार आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, झहीर खान हे प्रमुख खेळाडू भारतीय संघातर्फे खेळत असल्याने मुंबईचा संघ कमकुवत झाला आहे. याचा प्रत्यय झारखंड आणि ओडिशाविरुद्धच्या लढतीत आला. वानखेडे मैदानावर झालेल्या या लढतीत मुंबईची गोलंदाजी निरुपद्रवी असल्याचे स्पष्ट झाले होते. वसिम जाफरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही.
शेवटच्या दोन लढतींत विजय मिळवता न आल्याने मुंबईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी सरकला आहे. सलग तीन विजयांसह कर्नाटकचा संघ २६ गुणांनिशी गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईला नमवत दमदार आगेकूच करण्यासाठी कर्नाटकचा संघ उत्सुक आहे.
फलंदाजीत वसिम जाफर हाच मुंबईचा आधारस्तंभ आहे. अभिषेक नायरकडून परिपक्व खेळीची अपेक्षा आहे. आदित्य तरे, सुशांत मराठे, सिद्धेश लाड यांनी खेळपट्टीवर टिकून राहत मोठी खेळी उभारण्याची मुंबईला गरज आहे. चांगल्या दर्जाच्या गोलंदाजीसमोर खेळताना मुंबईच्या फलंदाजांच्या तंत्र आणि संयमाची कसोटी लागणार आहे. हिकेन शाहने ओडिशाविरुद्ध शतकी खेळी साकारत उपयुक्तता सिद्ध केली होती. या कामगिरीत त्याने सातत्य राखणे आवश्यक आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे.
गोलंदाजीत जावेद खान, क्षेमल वायंगणकर, शार्दुल ठाकूर, विशाल दाभोळकर यांच्यावर भिस्त आहे. ४२ वर्षीय प्रवीण तांबेला पुन्हा एकदा अंतिम संघात स्थान मिळते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
दुसरीकडे विनय कुमारच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचा संघ दमदार प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मनीष पांडे, मयांक अगरवाल, लोकेश राहुल हे  चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीत विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, श्रीनाथ अरविंद यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी उपयुक्त ठरू शकतो.