दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक होऊनही अभिमन्यू मिथुन आणि रविकुमार समर्थ यांनी कर्नाटकची धुरा सक्षमपणे सांभाळून रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपान्त्य फेरीच्या लढतीत मुंबईसमोर ४४५ धावांचे लक्ष्य ठेवल़े  पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवशी मिथुन व समर्थ या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली़  हे दोघेही फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईने २८६ धावांवर कर्नाटकचा डाव गुंडाळला़  मात्र, पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईसमोर विजयासाठी डोंगराएवढे आव्हान उभे राहिल़े  मुंबईचा लक्ष्याचा मार्ग खडतर असला तरी त्यांनी दिवसअखेर बिनबाद ६१ धावा केल्या आहेत़  त्यांना तीन दिवसांत ३८४ धावांचा पल्ला पार करायचा आह़े
 दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, त्या वेळी आघाडी भक्कम करण्याच्या निर्धाराने मिथुन-समर्थ कंबर कसूनच मैदानात उतरले होत़े  सुरुवातीला स्वत:ला खेळपट्टीवर सावरून नंतर या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला़  
मिथुनने ११३ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या़  खेळपट्टीवर जम बसवलेल्या या खेळाडूला शार्दुलने त्रिफळाचीत करून माघारी धाडल़े  त्यापाठोपाठ ५८ धावांची उपयुक्त खेळी करणारा समर्थही हरमित सिंगच्या गोलंदाजीवर यष्टिचीत होऊन माघारी परतला़  मनीष पांडे आणि करुण नायर या जोडीने संघर्ष करून पाचव्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या़   शार्दुल, बलविंदर आणि हरमित सिंग यांनी कर्नाटकचा दुसरा डाव २८६ धावांत गुंडाळला़ त्यानंतर, मुंबईकर आदित्य तरे आणि अखिल हेरवाडकर यांनी दिवसअखेर १७ षटके खेळून काढली.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : सर्वबाद २०२ आणि (दुसरा डाव) : सर्वबाद २८६ (अभिमन्यु मिथुन ८९, रविकुमार समर्थ ५८, मनीष पांडे ४२; शार्दुल ठाकूर ४/६९, बलविंदरसिंग संधू ३/४५) वि़  मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद ४४ आणि (दुसरा डाव) : बिनबाद ६१  (आदित्य तरे नाबाद ४०, अखिल हेरवाडकर नाबाद २१)