रणजी स्पर्धेतल्या इतिहासात ५०० वा सामना खेळणाऱ्या मुंबईच्या संघावर पराभवाचे काळे ढग जमायला लागले आहेत. वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात बडोद्याने यजमान मुंबईवर पहिले तिनही दिवस चांगलचं वर्चस्व गाजवलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईचे ४ फलंदाज माघारी परतले असून मुंबईचा संघ अजुनही ३०२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राखायचा असल्यास अजिंक्य रहाणे आणि मुंबईच्या इतर फलंदाजांना दिवसभर किल्ला लढवावा लागणार आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि सुर्यकुमार यादव हे खेळाडू मैदानावर खेळत आहेत.

मुंबईचं बलस्थान मानल्या जाणाऱ्या फलंदाजीने या सामन्यात चांगलाच घात केला. पहिल्या डावाता कर्णधार आदित्य तरेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजांने चमकदार कामगिरी केली नाही. पहिल्या डावात कसोटीवीर अजिंक्य रहाणे भोपळाही फोडू शकला नाही. याव्यतिरीक्त श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, अभिषेक नायर यासारख्या फलंदाजांनाही निराशा केली. त्यामुळे पहिल्या डावात मुंबईचा संघ अवघ्या १७१ धावांमध्ये ऑलआऊट झाला. अतित सेठ आणि लुकमन मेरीवाला या गोलंदाजांनी ५-५ बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

मुंबईच्या या आव्हानाचा बडोद्याच्या फलंदाजांनी चांगला सामना केला. आदित्य वाघमोडे आणि स्वप्निल सिंह यांच्या शतकाच्या जोरावर बडोद्याने पहिल्या डावात ५७५ धावांची मजल मारली. बडोद्याच्या संघाला बाद करण्यासाठी मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने तब्बल ८ गोलंदाजांना संधी दिली. अखेर ५७५/९ या धावसंख्येवर बडोद्याने आपला डाव घोषित केला.

दुसऱ्या डावातही मुंबईची सुरुवात काहीशी अडखळतीच झाली. कर्णधार आदित्य तरे झटपट माघारी परतल्यानंतर, अजिंक्य रहाणेने पृथ्वी शॉच्या मदतीने आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावात पृथ्वीने ५६ धावांची खेळी करत अर्धशतकही झळकावलं. मात्र स्वप्निल सिंहने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवत मुंबईला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि नाईट वॉचमन विजय गोहील यालाही झटपट माघारी धाडण्यात बडोद्याच्या गोलंदाजांना यश आलं. त्यामुळे मुंबईला हा सामना अनिर्णित राखायचा असल्यास, अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांना उद्याचा दिवस खेळून काढावा लागणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर ५०० वा सामना खेळणारी मुंबई आपला पराभव टाळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.