रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत, ध्रुव शौरीच्या शतकाने दिल्लीने पहिल्या दिवसाच्या खेळावर आपला ठसा उमटवला आहे. विदर्भाचा नवोदीत गोलंदाज आदित्य ठाकरेने दिल्लीच्या सुरुवातीच्या फलंदाजांना धक्के देत माघारी पाठवलं. आदित्यने कुणाल चंडेला आणि नितीश राणा यांना माघारी धाडत दिल्लीच्या संघाला धक्के दिले. मात्र ध्रुव शौरीने एकाबाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरत, दिल्लीचा वरचष्मा कायम राखला. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीच्या नावाजलेल्या फलंदाजांना या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. गौतम गंभीर पहिल्या डावात १५ धावा काढून बाद झाला, अक्षय वाखरेने त्याचा त्रिफळा उडवला.

दुसरीकडे मधल्या फळीत हिम्मत सिंहने ६६ धावा काढून ध्रुव शौरीला चांगली साथ दिली. विदर्भाकडून रजनीश गुरबानीने २ विकेट घेत आदित्य ठाकरेला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दिल्लीने ६ गड्यांच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या होत्या. दिल्लीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे शतकवीर ध्रुव शौरी अजुनही मैदानावर कायम आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी दिल्लीचे फलंदाज कसा खेळ करतात हे पहावं लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक – दिवस पहिला, दिल्ली २७१/६ ध्रुव शौरी १२३ नाबाद, हिम्मत सिंह ६६

विरुद्ध विदर्भ – आदित्य ठाकरे २/४४, आदित्य ठाकरे २/६५