बडोद्याची ४ बाद ३७६ अशी दमदार मजल

मुंबईच्या ऐतिहासिक पाचशेव्या रणजी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमातून बडोद्याच्या आदित्य वाघमोडेने प्रेरणा घेतली. मुंबई एवढा मोठा पराक्रम करू शकते, तर आपण का नाही, ही मनाशी खूणगाठ बांधून मुंबईविरुद्धच्या रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ‘खडूस’ शतक झळकावत वाघमोडेने मुंबईला झगडायला लावले. त्यामुळे बडोद्याने दिवसअखेर ४ बाद ३७६ अशी मजल मारली असून मुंबईचा संघ २०५ धावांनी पिछाडीवर आहे.

‘‘वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यावेळी मुंबईच्या मोठेपणातून स्फूर्ती घेत या सामन्यात काही तरी खास करायचे, हा विचार मनात रुंजी घालत होता. डोक्यात जे होते, ते मैदानात बॅटच्या माध्यमातून उतरवले. संघासाठी काहीतरी चांगले करू शकलो, याचा आनंद आहे,’’ असे शतकवीर आदित्यने सामन्यानंतर सांगितले.

मुंबईचा हा पाचशेवा ऐतिहासिक सामना. पण आतापर्यंत १००, २००, ३००, ४००व्या शतकमहोत्सवी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ कधीही पिछाडीवर पडला नव्हता. प्रत्येक सामन्यात मुंबईने मर्दुमकी गाजवली होती. पण पाचशेव्या सामन्यात मात्र मुंबईवर पिछाडीची नामुष्की ओढवली.

गुरुवारी भेदक मारा करणारा रॉस्टन डायस दुसऱ्या दिवसातील पहिल्याच षटकात जायबंदी झाला. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू टाकत असताना त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली आणि त्यानंतर दिवसभर तो मैदानात उतरला नाही. मुंबईसाठी हाच पहिला मोठा धक्का होता. या धक्क्य़ातून मुंबईचा संघ अखेपर्यंत सावरला नाही. कारण मुंबईला दुसऱ्या दिवसात फक्त तीनच बळी मिळवता आले.

शुक्रवारचा नायक ठरला तो आदित्य. पहिल्या दिवशी सात धावांवर त्याला जीवदान मिळाले होते. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याचा खेळ हा डोळ्यांचे पारणे फेडणाराच होता. मुंबईच्या गोलंदाजीवर तो चाल करून गेला नाही. डोके शांत आणि बॅटमध्ये ओतप्रोत भरलेला संयतपणा, हे त्याच्या खेळीचे वैशिष्टय़ ठरले. तब्बल ४९२ मिनिटे त्याने किल्ला लढवला आणि मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानातच हतबल करून सोडले. एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याची बॅटवर पकड सैल झाली आणि श्रेयस अय्यरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. आदित्यने ३०९ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि एकमेव षटकाराच्या जोरावर १३८ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. आतापर्यंतच्या रणजी सामन्यांमधली माझी ही सर्वोत्तम खेळी आहे, असे आदित्यने सांगितले.

नांगरधारी आदित्य खेळपट्टीवर ठाण मांडून उभा असला तरी त्याच्याबरोबर खेळणाऱ्या तिन्ही फलंदाजांनी संघाची धावगती वाढवण्यावर भर दिला. विष्णू सोळंकीने ९ चौकारांच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. तो बाद झाल्यावर बडोद्याचा कर्णधार दीपक हुडा फलंदाजीला आला. हुडा ३८ धावांवर असताना शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर आदित्य तरेने त्याला झेल सोडत जीवदान दिले. या जीवदानाचा फायदा उठवत हुडाने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी नाबाद राहत स्वप्निल सिंगने नाबाद ६३ धावांची खेळी साकारली. हे तिन्ही फलंदाज आपली साहाय्यक भूमिका बजावत असले तरी आदित्यनेही त्यांना सांभाळून घेतले. मुंबईची गोलंदाजी किती दिशाहीन आणि बोथट आहे, याचा प्रत्यय दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आला.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई (पहिला डाव) : १७१.
  • बडोदा (पहिला डाव) : ११५ षटकांत ४ बाद ३७६ (आदित्य वाघमोडे १३८, दीपक हुडा ७५, स्वप्निल सिंग खेळत आहे ६३; श्रेयस अय्यर १/२२, शार्दुल ठाकूर १/८४).

आम्ही मुंबईविरुद्धच्या सामन्यात आघाडी घेतली असली तरी सामना अजूनही संपलेला नाही. पहिल्या डावात किती धावा करायच्या, असे आम्ही काहीच ठरवलेले नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यात आम्ही किती चांगली कामगिरी केली, हे खेळाडूंना आम्ही सांगितलेले नाही. जर खेळाडमूंना त्यांच्या या कामगिरीची जाणीव करून दिली तर ते दिशाहीन होऊ शकतात.   – अतुल बेडादे, बडोद्याचे प्रशिक्षक