देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक चषक स्पर्धेत विदर्भाच्या संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. उपांत्यपूर्व सामन्यात केरळला पराभूत करत विदर्भ संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. सुरतमधील लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर केरळ आणि विदर्भ यांच्यातील उपांत्यपूर्व सामना खेळवण्यात आला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २४६ धावा केल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करताना केरळचा पहिला डाव १७६ धावांत आटोपला. पहिल्या डावातील ७० धावांच्या आघाडीसह विदर्भ संघाने दुसऱ्या डावात ५०७ धावा केल्या. अल्पशा आघाडीनंतर धावांचा डोंगर रचत केरळला त्यांनी ५७८ धावांचे मोठे आव्हान दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना केरळचा संघ १६५ धावावर आटोपला. विदर्भाने हा सामना ४१२ धावांनी जिंकला.

उपांत्यफेरीत विदर्भासमोर कर्नाटकचे आव्हान असणार आहे. रणजी करंडक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ अशी मर्दुमकी मिरवणाऱ्या मुंबईला पराभूत करुन कर्नाटक उपांत्य फेरीत पोहोचला आहे. कर्नाटकने चौथ्या दिवशीच मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभूत करून दिमाखात उपांत्य फेरी गाठण्याची किमया साधली होती. त्यामुळे कर्नाटकला पराभूत करण्याचे मोठे आव्हान विदर्भासमोर आहे.