रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या सामन्यात बडोद्यावर मात केल्यानंतर, मुंबईला घरच्या मैदानावर आधी रेल्वे आणि त्यानंतर कर्नाटकविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. ५ गडी राखून कर्नाटकने मुंबईवर मात केली. सलग दुसऱ्या डावातही मुंबईची फलंदाजी चांगलीच कोलमडली.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना मुंबईची फळी पुरती कोलमडली. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे बिनीचे शिलेदार पुरते अपयशी ठरले. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि त्याला शशांक अत्राडेने ३५ धावा करत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने पहिल्या डावात १९४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचीही पहिल्या डावातली सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मुंबईच्या शशांक अत्राडेने कर्नाटकच्या डावाला खिंडार पाडलं, मात्र पहिल्या डावातत २४ धावांची आघाडी मिळवण्यात कर्नाटक यशस्वी ठरला.

पृथ्वी शॉ क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुंबईला आणखी एक धक्का बसला. यानंतर दुसऱ्या डावातही मुंबईच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली. आदित्य तरे, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड हे बिनीचे शिलेदार झटपट माघारी परतले. मधल्या फळीत सरफराज खान आणि शम्स मुलानी यांनी थोडाफार कर्नाटकच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. अभिमन्यू मिथुन, कौशिक आणि जैन या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबईचा दुसरा डाव १४९ धावांत गुंडाळला.

१२६ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कर्नाटकची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर समर्थ आणि पडीक्कल जोडीने ७८ धावांची भागीदारी केली. मात्र शशांक अत्राडेने दुसऱ्या डावातही चांगली गोलंदाजी करत कर्नाटकला हादरे दिले. निम्मा संघ माघारी परतल्यानंतर सामन्यात चुरस निर्माण झाली होती, मात्र श्रेयस गोपाळ आणि शरथ या फलंदाजांनी कर्नाटकच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादव, सरफराज खान तर गोलंदाजीत शशांक अत्राडने दोन्ही डावांत आपली चमक दाखवली.