२०१९-२० हंगामात आपला पहिला रणजी सामना खेळणाऱ्या मुंबईने बडोद्यासमोर विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने झळकावलेलं द्विशतक आणि त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद १०२ धावा करत दिलेली उत्तम साथ या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०९ धावांपर्यंत मजल मारली. पृथ्वी शॉने २०२ धावा केल्या.

पहिल्या डावात मुंबईने सांघिक खेळाच्या जोरावर ४३१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बडोद्याचा पहिला डाव ३०७ धावांवर आटोपला. बडोद्याकडून सलामीवीर केदार देवधरने नाबाद १६० धावांची खेळी केली, त्याला विष्णू सोळंकीने ४८ धावा काढून चांगली साथ दिली. मुंबईकडून शम्स मुलानीने ६ बळी घेतले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने धडाकेबाज खेळी करत २०२ धावांची खेळी केली. त्याला जय बिस्ता आणि सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत चांगली साथ दिली.

मुंबईच्या या आक्रमक खेळामुळे बडोद्याला विजयासाठी ५३४ धावांची गरज आहे. दुसऱ्या डावातही बडोद्याची सुरुवात खराब झाली आहे. सलामीचे ३ फलंदाज अवघ्या ७४ धावांमध्ये माघारी परतले आहेत. शम्स मुलानीने २ तर तुषार देशपांडेने एका फलंदाजाला माघारी धाडलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेरीस मुंबईकडे अद्यापही ४६० धावांची आघाडी आहे, त्यामुळे अखेरच्या दिवशी बडोद्याच्या फलंदाजांना सामना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.