scorecardresearch

Ranji Trophy : ज्यांना टीम इंडियाने डावललं, त्यांनीच बंगालला फायनलमध्ये पोहोचवलं, ३४ वर्षांचा दुष्काळ संपणार?

रणजी चषक २०२२-२३ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेत उपांत्य सामन्यात मनोज तिवारीच्या बंगालने गतविजेत्या मध्य प्रदेशवर तब्बल ३०६ धावांनी मात केली आहे.

Ranji Trophy 2022-23
रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बंगालने मध्य प्रदेशवर मात केली. (PC : PC : Instagram/mannirocks14)

इंदूरच्या होळकर मैदानात रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मध्य प्रदेशवर बंगालच्या संघाने मात केली आहे. बगालने तब्बल ३०६ धावांनी मोठा विजय मिळवला. मध्य प्रदेशची मजबूत फलंदाजी बंगालच्या गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरली. दुसऱ्या डावात मंध्य प्रदेशच्या फलंदाजांना केवळ २४१ धावा करता आल्या. या सामन्यात पहिल्या डावात बंगालने ४३८ धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा संघ केवळ १७० धावा करू शकला. त्यानंतर बंगालने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या. त्यानंतर ५४८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघाला केवळ २४१ धावा करता आल्या. परिणामी गतविजेत्या संघाने हा सामना ३०६ धावांनी गमावला.

बंगालच्या विजयाची पटकथा चार खेळाडूंनी लिहिली, ज्यामध्ये अनुस्तूप मुजूमदार, आकाश दीप, प्रदीप्ता प्रामाणिक आणि सुदीप कुमार यांचा समावेश आहे. परंतु यांच्यासह बंगालच्या कर्णधाराची चर्चा आणि कौतुक होत आहे. आकाश दीप या सामन्याचा हिरो ठरला. त्याने पहिल्या डावात १८ षटकात ४२ धावा देत ५ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात प्रदिप्ता प्रामाणिक याने ५१ धावात ५ बळी घेतले. तर अनुस्तूप (१२०) आणि सुदीप कुमार (११२) यांनी पहिल्या डावात शतकं ठोकली.

१९८९-९० सालचा रणजी चषक बंगालने जिंकला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा संघ कधीच रणजी चषक उंचावू शकला नाही. गेल्या ३४ वर्षात बंगालचा संघ ४ वेळा फायनलमध्ये पोहोचला. परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बंगाल संघाचे कर्णधार मनोज तिवारी हे राज्याचे क्रीडा मंत्री देखील आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बंगालला रणजी चषकाची आशा दाखवली आहे. ते या संघाला रणजी चषक जिंकवून देतात की नाही ते येत्या काही दिवसात कळेल.

शेतकऱ्याच्या मुलाची कमाल!

बंगालला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मध्यमगती गोलंदाज आकाश दीपचा सिंहाचा वाटा आहे. या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजाने ९ सामन्यांमध्ये ३७ बळी घेतले आहेत. दमदार कामगिरीच्या जोरावर आकाश दीपची टीम इंडियात निवड झाली आहे. परंतु त्याला आतापर्यंत पदार्पणाची संधी मिळाली नाही. आकाश दीप आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळतो.

हे ही वाचा >> Ind Vs Pak: स्मृती मंधाना संघाबाहेर, कप्तान जखमी, पाकिस्तानविरोधात कशी जिंकणार टीम इंडिया?

कप्तान मनोज तिवारीचं कौतुक

आकाश दीपसारखीच परिस्थिती मनोज तिवारीची देखील आहे. त्याला देखील टीम इंडियात पुरेशी संधी मिळाली नाही, असं त्याच्या चाहत्यांसह जवळच्या लोकांना वाटतं. मनोज तिवारीने १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये त्याने एक शतक आणि एका अर्धशतकासह २८७ धावा जमवल्या. तर त्याला तीन टी-२० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. यात त्याला केवळ एकाच डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या डावात त्याने १५ धावा जमवल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 16:33 IST
ताज्या बातम्या