scorecardresearch

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची विजयी सलामी

पवन शहाच्या (२१९) द्विशतकाच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४१५ धावांची मजल मारली होती.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची विजयी सलामी
सत्यजीत बच्छाव

बच्छावमुळे आसामवर एक डाव आणि सात धावांनी वर्चस्व

रोहतक : डावखुरा फिरकीपटू सत्यजीत बच्छावच्या (७/४५) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने ग-गटातील लढतीत आसामवर एक डाव आणि सात धावांनी वर्चस्व गाजवून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

रोहतक येथे झालेल्या या सामन्यात पदार्पणवीर पवन शहाच्या (२१९) द्विशतकाच्या बळावर महाराष्ट्राने पहिल्या डावात ४१५ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात आसामचा संघ २४८ धावांत गारद झाल्याने महाराष्ट्राला पहिल्या डावात १६७ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने आसामला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी आसामचा दुसरा डाव १६० धावांत संपुष्टात आल्याने महाराष्ट्राने विजयाची नोंद केली. पहिल्या डावात चार बळी मिळवणाऱ्या बच्छावने दुसऱ्या डावातही प्रभावी मारा करताना ४५ धावांच्या मोबदल्यात सात गडी बाद केले.

आसामने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ३ बाद ८२ अशा धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रियान पराग (५६) आणि स्वरूपम पुर्कायास्था (३८) यांनी चौथ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी रचत आसामचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज इंगळेने परागला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर बच्छावने १६ धावांच्या अंतराने सहाही बळी घेत आसामचा डाव १६० धावांवर संपुष्टात आणला.

संक्षिप्त धावफलक

’ महाराष्ट्र (पहिला डाव) : ४१५

’ आसाम (पहिला डाव) : २४८

’ आसाम (दुसरा डाव) : ७३ षटकांत सर्वबाद १६० (रियान पराग ५६, स्वरूपम पुर्कायास्था ३८; सत्यजीत बच्छाव ७/४५, मनोज इंगळे २/२९)

’ सामनावीर : पवन शहा

’ गुण : महाराष्ट्र ७, आसाम ०

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या