Ranji Trophy 2026 knockout schedule: रणजी करंडक २०२५-२६ च्या साखळी फेरीचा टप्पा रविवारी संपन्न झाला. चारही एलिट गटांमध्ये सात फेऱ्यांतील सामने पार पडल्यानंतर आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश निश्चित केला. गतविजेता विदर्भ संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर मुंबईचा संघ पुढच्या फेरीत पोहोचला आहे. या उपांत्यपूर्व फेरीचं वेळापत्रक कसं असेल जाणून घेऊया.

गतविजेत्या विदर्भाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ३१ गुण आणि चार विजय असूनही विदर्भाला पुढे जाता आलं नाही. उत्तर प्रदेशविरुद्ध विजय मिळवत सहा गुण मिळवूनही, मागील फेरीत आंध्र प्रदेशकडून झालेल्या पराभवाची किंमत विदर्भाला मोजावी लागली. आंध्र प्रदेश आणि झारखंडसोबत ३१ गुण समान असतानाही, बोनस गुणांच्या कमी विजयांमुळे (पहिला टाय-ब्रेकर) विदर्भ तिसऱ्या स्थानावर गेला.

ब गटात महाराष्ट्रावर विजय मिळवत मध्य प्रदेश अव्वल स्थानावर राहिला. त्याच गटातून दुसरा संघ म्हणून कर्नाटकने अखेरच्या क्षणी पात्रता मिळवली. पंजाबविरुद्धच्या थरारक विजयामुळे कर्नाटकने सौराष्ट्राला पिछाडीवर टाकलं. देवदत्त पडिक्कलच्या नाबाद १२० धावांच्या खेळीच्या बळावर कर्नाटकने अखेरच्या दिवशी केवळ २८ षटकांत २५० धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

मुंबईचा रणजी क्वार्टरफायनलमध्ये कोणाविरूद्ध होणार सामना?

क गटात तब्बल ३६ गुणांसह बंगालने अव्वल स्थान पटकावलं, तर उत्तराखंडने त्यांच्यामागे राहून पात्रता मिळवली. शेवटच्या एलिट गटातून विक्रमी वेळेस रणजीचं जेतेपद पटकावणारा मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर केवळ एक गुण मिळवू शकलेल्या नागालँड संघाला पुढील हंगामात पुन्हा प्लेट गटात जावं लागल आहे.

उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले संघ

आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, बंगाल, उत्तराखंड, मुंबई आणि जम्मू-काश्मीर

रणजी करंडक २०२५-२६ बाद फेरीचे संपूर्ण वेळापत्रक

उपांत्यपूर्व फेरी (क्वार्टर फायनल)
६ ते १० फेब्रुवारी २०२६

क्वार्टर फायनल १: झारखंड विरुद्ध उत्तराखंड

क्वार्टर फायनल २: मध्य प्रदेश विरुद्ध जम्मू-काश्मीर

क्वार्टर फायनल ३: बंगाल विरुद्ध आंध्र प्रदेश

क्वार्टर फायनल ४: मुंबई विरुद्ध कर्नाटक

उपांत्य फेरी
१५ ते १९ फेब्रुवारी २०२६

पहिली उपांत्य फेरी: क्वार्टर फायनल १ चा विजेता विरुद्ध क्वार्टर फायनल ४ चा विजेता

दुसरी उपांत्य फेरी: क्वार्टर फायनल २ चा विजेता विरुद्ध क्वार्टर फायनल ३ चा विजेता

रणजी ट्रॉफी अंतिम सामना

२४ ते २८ फेब्रुवारी २०२६