मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची प्रतिष्ठा आणि महत्त्व कमी होत चालल्याची चिंता गेल्या काही वर्षांत व्यक्त केली जात आहे. मात्र, या स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला आज, रविवारपासून सुरुवात होत असून, कसोटी संघातील आघाडीचे खेळाडू पहिल्या फेरीत सहभागी होणार असल्याने दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. नामांकित खेळाडूंची उपस्थिती आणि नवोदितांची राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे यंदाच्या स्पर्धेत चुरस पाहायला मिळू शकते.
गेल्या हंगामात जम्मू-काश्मीरने प्रथमच विजेतेपद पटकावून इतिहास घडवला. वेगवान गोलंदाज अकिब नबी याने अंतिम सामन्यात कर्नाटकच्या केएल राहुल आणि करुण नायर यांसारख्या फलंदाजांना बाद करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी गावातून पुढे आलेल्या नबीने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातही स्थान मिळवले. आता त्याच्याप्रमाणेच कारकीर्दीत पुढचा टप्पा गाठण्याचा देशातील अन्य युवा खेळाडूंचाही प्रयत्न असेल.
कसोटीपटूंचा सहभाग
पहिल्या फेरीत कर्नाटककडून केएल राहुल, मुंबईकडून यशस्वी जैस्वाल, सौराष्ट्रकडून रवींद्र जडेजा, तमिळनाडूकडून वॉशिंग्टन सुंदर आणि हैदराबादकडून मोहम्मद सिराज यांसारखे नामांकित कसोटीपटू खेळणार आहेत. मुंबईचा सर्फराज खान कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबईचाच आयुष म्हात्रे आणि झारखंडचा शिखर मोहन या युवा सलामीवीरांकडेही लक्ष असेल. पदार्पणाच्या हंगामात सहाशेहून अधिक धावा करणार्या मोहनकडून यंदा मोठ्या अपेक्षा आहेत.
शमीसाठी महत्त्वाचा हंगाम
बंगालचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने गेल्या हंगामात ३७ बळी मिळवले होते. तीन वर्षांहून अधिक काळ कसोटी संघाबाहेर असलेल्या शमीसाठी यंदाचा हंगाम पुनरागमनाची संधी ठरू शकतो. भुवनेश्वर कुमारने ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या जोरावर ट्वेन्टी-२० संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. त्याच धर्तीवर प्रभावी कामगिरी करून कसोटी संघात पुनरागमन करण्याचा शमीचा प्रयत्न असेल. बंगाल संघात त्याला मुकेश कुमार आणि आकाश दीप या कसोटी क्रिकेटचा अनुभव असलेल्या अन्य वेगवान गोलंदाजांची साथ लाभेल.
फिरकीपटूंसाठी संधी
फिरकीपटूंमध्ये राजस्थानचा मानव सुथार, विदर्भाचा हर्ष दुबे, मध्य प्रदेशचा सारांश जैन आणि उत्तर प्रदेशचा झीशान अन्सारी यांच्याकडे लक्ष असेल.आगामी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभावी कामगिरी करणार्या फिरकीपटूंना राष्ट्रीय संघातील स्थानासाठी आपली दावेदारी मजबूत करता येईल. त्यामुळे भारतीय संघासाठी नवे तारे शोधण्याच्या दृष्टीने यंदाचा हंगाम महत्त्वाचा ठरू शकतो. या स्पर्धेसाठी विदर्भाचा ‘अ’, महाराष्ट्राचा ‘क’, तर मुंबईचा ‘ड’ गटात समावेश करण्यात आला आहे.
अर्जुन तेंडुलकर संघाबाहेर
रणजी करंडकाच्या सलामीच्या लढतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या गोव्याच्या १६ सदस्यीय संघातून अर्जुन तेंडुलकरला वगळण्यात आले आहे. २०२२ मध्ये रणजी पदार्पणातच शतक झळकावणार्या अर्जुनला त्यानंतर कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गेल्या हंगामात सात सामन्यांत फलंदाजीत त्याला केवळ १५३ धावा करता आल्या, तर डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याने १५ बळी मिळवले. गोवा संघाच्या अलीकडेच झालेल्या ओमान दौर्यातही तो सहभागी झाला नव्हता. आता तो रणजी संघातूनही बाहेर झाला आहे.
विदर्भाच्या हर्ष दुबेकडे लक्ष
माजी विजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना पुदुच्चेरीविरुद्ध नागपूरमधील जामठा मैदानावर होणार आहे. अक्षय वाडकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या विदर्भ संघाला फिरकीपटू हर्ष दुबे, अनुभवी फलंदाज ध्रुव शोरी, यश राठोड, अथर्व तायडे, अमन मोखाडे आणि वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. विदर्भाने २०२४-२५च्या हंगामात रणजी करंडक जिंकला, तेव्हा हर्ष दुबेने तब्बल ६९ बळी मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. त्याने मर्यादित षटकांचे सामने खेळले असले, तरी त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आता विदर्भाकडून पुन्हा चमकदार कामगिरी करून कसोटी संघाची दारे ठोठावण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
महाराष्ट्रासाठी पृथ्वीच्या नेतृत्वाची कसोटी
महाराष्ट्राचा पहिला सामना सेनादलाविरुद्ध नवी दिल्लीतील पालम मैदानावर होणार आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या भारत ‘अ’ संघाकडून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत आहे. त्यामुळे पहिल्या रणजी सामन्यासाठी तो अनुपलब्ध असल्याने पृथ्वी शॉ महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. अंकित बावणे, सचिन धस, सिद्धेश वीर, मुकेश चौधरी आणि राजवर्धन हंगर्गेकर हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पृथ्वी शॉने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे, तसेच मुंबईच्या रणजी संघाचे नेतृत्व करताना आपली छाप पाडली होती. आता महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून तो कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
अनुभवी खेळाडूंवर मुंबईची मदार
’ विक्रमी ४२ वेळा रणजी करंडक जिंकणारा मुंबईचा संघ यंदाच्या मोहिमेची सुरुवात चंडीगडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर करणार आहे. सिद्धेश लाड संघाचे नेतृत्व करणार असून, युवा आयुष म्हात्रे उपकर्णधार आहे.
’ यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांसारखे अनुभवी खेळाडू मुंबईच्या संघात आहेत. त्यांच्यावरच संघाची मदार असेल. गेल्या हंगामातील कर्णधार आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.
’ रणजी करंडक पुन्हा जिंकायचा असल्यास मुंबईला गोलंदाजीत मोठी सुधारणा करावी लागेल. वेगवान गोलंदाजी हा मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. तुषार देशपांडेला मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसुझा आणि ओनकार तरमाळे यांची साथ मिळणे आवश्यक आहे.
’ फलंदाजीत जैस्वाल आणि सर्फराज यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. आगामी न्यूझीलंड दौर्यापूर्वी मोठी खेळी करण्याचा जैस्वालचा प्रयत्न असेल.
स्पर्धा दोन टप्प्यांत…
’ गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर दुसरा टप्पा १७ जानेवारी ते ३ मार्च २०२७ या कालावधीत खेळवला जाईल. ’ एलिट विभागात ३२ संघांचा समावेश असून, त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल पाच संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील.
