Jalaj Saxena Record In First Class Record: रणजी ट्रॉफी स्पर्धेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत पु्न्हा एकदा युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातील पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा फिरकीपटू जलज सक्सेनाच्या फिरकी गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना गोवा संघाचा पहिला डाव अवघ्या २०९ धावांवर आटोपला. या डावात जलज सक्सेनाने ७९ धावा खर्च करून ६ गडी बाद केले. यासह त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. दरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडून काढला आहे.
या डावात गोलंदाजी करताना त्याने ३४ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ७९ धावा खर्च करून ६ फलंदाजांना पॅव्हेलिनची वाट दाखवली. यासह त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३३ व्यांदा ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. या दमदार कामगिरीसह त्याने मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. जलज सक्सेना हा रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्य स्थानी पोहोचला आहे. रणजी ट्रॉफीत त्याने आतापर्यंत ४४६ गडी बाद केले आहेत. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या विक्रमात विनय कुमारला मागे टाकलं आहे. विनय कुमारच्या नावे रणजी ट्रॉफी स्पर्धेत ४४२ गडी बाद करण्याची नोंद आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या राजिंदर गोयल यांनी ६३७ गडी बाद केले होते.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
राजिंदर गोयन- ६३७ विकेट्स
एस. वेंकटराघवन- ५३० विकेट्स
सुनील जोशी- ४७९ विकेट्स
जलज सक्सेना- ४४६ विकेट्स
विनय कुमार- ४४२ विकेट्स
नरेंद्र हिरवानी- ४४१ विकेट्स
बीएस चंद्रेशेखर- ४३७ विकेट्स
जलज सक्सेना देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण त्याला भारतीय संघासाठी एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण या गोष्टीचा त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीवरील कुठलाही फरक पडलेला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध करण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला १५६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान फलंदाजीत ७००० धावा करण्यासह गोलंदाजीत त्याने ५०० गडी बाद केले आहेत. जलज सक्सेना ३९ वर्षांचा आहे, पण अजूनही तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
