आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबईची गोव्याशी गाठ
पीटीआय, अहमदाबाद : मुंबई-गोवा यांच्यातील एलिट ड-गटातील साखळी लढतीला गुरुवारपासून प्रांरभ होत असून, सातत्याने अपयशी ठरल्यामुळे भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर सर्वाचे लक्ष असेल. रणजीतील सौराष्ट्रविरुद्धच्या सलामीच्या लढतीत रहाणेने १२९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. परंतु या खेळीमुळे रहाणेला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघातील स्थान टिकवता आले नाही. माजी उपकर्णधार रहाणे गोव्याविरुद्ध मोठी खेळी साकारून निवड समितीचे दार ठोठावण्याचा प्रयत्न करील. याशिवाय सौराष्ट्रविरुद्ध २७५ धावांची मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या युवा सर्फराज खानच्या फलंदाजीवर मुंबईची भिस्त असेल. कर्णधार पृथ्वी शॉ, आकर्षित गोमेल, सचिन यादव आणि अनुभवी यष्टीरक्षक आदित्य तरे यांच्यासारखे फलंदाज असल्यामुळे मुंबई गोव्याविरुद्धही धावांचा डोंगर उभारेल अशी आशा आहे
मुंबईच्या गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीवर असेल, प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी मिळवायचे असतील, तर ऑफ-स्पिनर तनुष कोटियन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज शाम्स मुलानी यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे, गोव्याची मदार कर्णधार स्नेहल कौठणकरवर असेल. ओडिशाविरुद्धच्या पहिल्या लढतीत त्याने नाबाद १६५ धावांची खेळी उभारली होती. परंतु त्याला सुयश प्रभुदेसाई, अमोघ देसाई आणि सुमिरन अमोणकर या अन्य फलंदाजांकडून तोलामोलाच्या साथीची आवश्यकता आहे. गोव्याच्या गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने श्रीकांत वाघवर असेल. शुभम रांजणे हा अष्टपैलू खेळाडूही गोव्यासाठी महत्त्वाचा ठरेल. एकंदरीतच मुंबईचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.