पीटीआय, बंगळूरु : देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने शनिवारी तब्बल ४७ व्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात मिळवलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने स्पर्धेत आगेकूच केली.

४१ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने बंगळूरु येथील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवले. यशस्वी जैस्वाल आणि हार्दिक तामोरे यांच्या शतकांमुळे मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावांची मजल मारली. मग त्यांनी उत्तर प्रदेशला अवघ्या १८० धावांवर रोखत पहिल्या डावात ११३ धावांची भक्कम आघाडी मिळवली. त्यानंतर मुंबईने अखेरचे दोन्ही दिवस फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

जैस्वाल आणि अरमान जाफर यांच्या शतकांमुळे मुंबईची चौथ्या दिवसअखेर ४ बाद ४४९ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे एकूण ६६२ धावांची आघाडी असल्याने अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशला पुनरागमन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले होते. पाचव्या दिवशी ओल्या मैदानामुळे पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा सामन्याला सुरुवात झाल्यावर मुंबईकडून सर्फराज खान (१०० चेंडूंत नाबाद ५९) आणि शम्स मुलानी (८९ चेंडूंत नाबाद ५१) यांनी अर्धशतके साकारली. सर्फराजच्या खेळीत एक चौकार आणि तीन षटकार, तर शम्सच्या खेळीत सहा चौकारांचा समावेश होता. अखेर मुंबईने दुसरा डाव ४ बाद ५३३ धावांवर घोषित केल्यानंतर सामना संपवण्यात आला. 

मध्य प्रदेशचे आव्हान

बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ जूनपासून रंगणाऱ्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईपुढे मध्य प्रदेशचे आव्हान असेल. डावखुरा फिरकीपटू कुमार कार्तिकेयच्या (५/६७) दुसऱ्या डावातील प्रभावी माऱ्यामुळे मध्य प्रदेशने बंगालवर १७४ धावांनी विजय मिळवत २३ वर्षांनंतर रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या चौथ्या डावात ३५० धावांचा पाठलाग करताना बंगालचा संघ १७५ धावांत गारद झाला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने एकाकी झुंज देताना १५७ चेंडूंत ७८ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

  • उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १८०
  • मुंबई (दुसरा डाव) : १५६ षटकांत ४ बाद ५३३ डाव घोषित (यशस्वी जैस्वाल १८१, अरमान जाफर १२७, सर्फराज खान नाबाद ५९, शम्स मुलानी नाबाद ५१; प्रिन्स यादव २/९२)