पीटीआय, बंगळूरु : यश दुबे आणि शुभम शर्मा यांच्या अनपेक्षित आणि चिवट शतकांमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये महासत्ता मानल्या जाणाऱ्या मुंबईची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावरील पकड ढिली झाली. मध्य प्रदेशने शुक्रवारी पहिल्यावहिल्या रणजी जेतेपदाच्या दिशेने सकारात्मक आगेकूच केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या दिवसअखेर मुंबईची पहिल्या डावातील ३७४ धावसंख्या समाधानकारक वाटत होती. पण तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशने ३ बाद ३६८ अशी भक्कम मजल मारत हे अंदाज चुकीचे ठरवले. दुबे (३३६ चेंडूंत १३३ धावा) आणि शर्मा (२१५ चेंडूंत ११६ धावा) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी २२२ धावांची भागीदारी करीत मध्य प्रदेशच्या धावसंख्येने महत्त्वाची भूमिका बजावली.

मध्य प्रदेशला पहिल्या डावातील निर्णायक आघाडी घेण्यासाठी आता फक्त सात धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी मध्य प्रदेशचा पहिला डाव लवकर गुंडाळून उर्वरित दोन दिवसांत सामना निकाली ठरवण्यासाठी मुंबईला प्रयत्न करावे लागतील. अन्यथा, मध्य प्रदेशने जेतेपदावरील दावेदारी मजबूत केली आहे. पहिला डाव शक्य होईल तितका लांबवून मुंबईला पुनरागमनाची कोणतीही संधी न देण्याची मध्य प्रदेशची योजना आहे. याआधी १९९८-९९मध्ये मध्य प्रदेशचा अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या वेळी कर्नाटककडून पराभवामुळे मध्य प्रदेशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली दुबे-शर्मा जोडीने मुंबईच्या गोलंदाजीपुढे ‘खडूस’ फलंदाजीचा प्रत्यय घडवला. शुक्रवारी संपूर्ण दिवसात मध्य प्रदेशने फक्त २४५ धावा केल्या. पण कुशल रणनीतीमुळे गोलंदाजांना अखेपर्यंत झगडायला लावले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीकडून मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही साथ मिळाली नाही. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून छाप पाडणारा रजत पाटीदार १३ चौकारांसह ६७ धावांवर तर, कर्णधार आदित्य श्रीवास्तव ११ धावांवर खेळत आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीने ४० षटकांत ११७ धावा देत फक्त एक बळी मिळवला. हे मुंबईसाठी सर्वात निराशाजनक ठरले. अनुभवी धवल कुलकर्णी (२१-३-५१-०) आणि तुषार देशपांडे (२४-८-७३-१) यांनाही दर्जाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. सकाळी पहिल्या अध्र्या तासाच्या खेळात दुबे-शर्माला धावांसाठी जखडून ठेवत दडपण आणण्याऐवजी फटके खेळण्याची संधीच जणू मुंबईच्या गोलंदाजांनी दिली. कुलकर्णीने उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकण्यातच धन्यता मानली. मुलानीच्या चेंडूवर शर्माने लाँग-ऑफला षटकार खेचल्यावर कर्णधार पृथ्वी शॉ आपली नाराजी लावू शकला नाही.

दुबेच्या खेळीत १४ चौकारांचा समावेश होता, तर शर्माने १५ चौकार आणि एक षटकाराची आतषबाजी केली. यंदाच्या हंगामात दुबेने ६१३ धावा आणि शर्माने ५७८ धावा काढून मध्य प्रदेशच्या इथपर्यंतच्या वाटचालीत सिंहाचा वाटा उचलला आहे. या जोडीने द्विशतकी भागदारीत ७६ एकेरी धावा काढल्या. शर्माचा अरमान जाफरने शॉर्ट पॉइंटला सोडलेला झेल मुंबईला महागात पडला. मोहित अवस्थीने (२०-५-५३-१) ही जोडी फोडण्यात यश मिळवले. यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने शर्माचा झेल टिपला. मग दुबेने रजत पाटीदारच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी केली. दुबेला मुलानीने तामोरेद्वारेच झेल बाद केले. मग उत्तरार्धातील ११ षटके पाटीदार आणि श्रीवास्तव यांनी खेळून काढली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ३७४

मध्य प्रदेश (पहिला डाव) : १२३ षटकांत ३ बाद ३६८ (यश दुबे १३३, शुभम शर्मा ११६, रजत पाटीदार खेळत आहे ६७; मोहित अवस्थी १/५३, तुषार देशपांडे १/७३)

मुंबईचे अष्टपैलू खेळाडू

(रणजी क्रिकेटमध्ये ३००+ धावा व ३०+ बळी )

खेळाडू सामने धावा   बळी    हंगाम

करसन घावरी    ७   ३२७    ३१ १९७४-७५

साईराज बहुतुले ८   ३८७    ३५ १९९३-९४

साईराज बहुतुले ९   ३१५    ४० २००२-०३

रमेश पोवार ७   ३१८    ४२ २००५-०६

शम्स मुलानी    ६   ३०४    ३८ २०२१-२२

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy cricket tournament mumbai grip loose dubey sharma centuries madhya pradesh ysh
First published on: 25-06-2022 at 00:02 IST