रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबई पराभवाच्या छायेत!; अद्याप ४९ धावांनी पिछाडीवर; मध्य प्रदेशच्या पाटीदारचे शतक

यश दुबे आणि शुभम शर्मा यांच्यापाठोपाठ रजत पाटीदारने (२१९ चेंडूंत १२२ धावा) केलेल्या शतकामुळे मध्य प्रदेशने रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यावरील वर्चस्व चौथ्या दिवशीही कायम राखले.

Rajat patidar
रजत पाटीदार

पीटीआय, बंगळूरु : यश दुबे आणि शुभम शर्मा यांच्यापाठोपाठ रजत पाटीदारने (२१९ चेंडूंत १२२ धावा) केलेल्या शतकामुळे मध्य प्रदेशने रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यावरील वर्चस्व चौथ्या दिवशीही कायम राखले.

चौथ्या दिवशी मध्य प्रदेशने ५३६ धावांची मजल मारत पहिल्या डावात एकूण १६२ धावांची आघाडी मिळवली. मग मुंबईच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आक्रमक शैलीत खेळ केला. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर मुंबईची २२ षटकांत २ बाद ११३ अशी धावसंख्या होती. मात्र, ते अजूनही ४९ धावांनी पिछाडीवर होते. कर्णधार पृथ्वी शॉ (५२ चेंडूंत ४४) आणि हार्दिक तामोरे (३२ चेंडूंत २५) यांनी फटकेबाज खेळी केल्यावर त्यांना अनुक्रमे गौरव यादव आणि कुमार कार्तिकेय यांनी माघारी पाठवले. दिवसअखेर अरमान जाफर (३४ चेंडूंत नाबाद ३०) आणि सुवेद पारकर (नाबाद ९) खेळपट्टीवर होते.

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ३ बाद ३६८ धावांवरून पुढे खेळताना मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी सुरू ठेवली. मध्य प्रदेशचा प्रमुख फलंदाज पाटीदारला तिसऱ्या दिवशी ५२ धावांवर जीवदान मिळाले होते. त्यानंतर मात्र त्याने मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. अर्धशतकानंतर त्याने संयमाने फलंदाजी करत खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ घालवण्यावर भर दिला. त्याने १६३व्या चेंडूवर दोन धावा काढत आपले प्रथम श्रेणी कारकीर्दीतील आठवे शतक झळकावले. अखेर २१९ चेंडूंत २० चौकारांच्या साहाय्याने १२२ धावांची खेळी केल्यावर पाटीदारला तुषार देशपांडेने बाद केले. त्याने सातव्या गडय़ासाठी सारांश जैन (९७ चेंडूंत ५७) याच्यासह ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे मध्य प्रदेशला ५०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले.

यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक गडी बाद करणारा मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने या डावातही टिच्चून मारा केला. त्याने ६३.२ षटकांत १७३ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले. तुषार देशपांडे (३/११६) आणि मोहित अवस्थी (२/९३) यांनाही बळी मिळवण्यात यश आले.

१२ मध्य प्रदेशकडून पहिल्या डावात यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके साकारली. रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यातील एका डावात तीन फलंदाजांनी शतके करण्याची ही एकूण १२वी वेळ ठरली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ३७४

मध्य प्रदेश (पहिला डाव) : १७७.२ षटकांत सर्वबाद ५३६ (यश दुबे १३३, रजत पाटीदार १२२, शुभम शर्मा ११६; शम्स मुलानी ५/१७३)

मुंबई (दुसरा डाव) : २२ षटकांत २ बाद ११३ (पृथ्वी शॉ ४४, अरमान जाफर नाबाद ३०, हार्दिक तामोरे २५; गौरव यादव १/२३)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy cricket tournament mumbai patidar century innings ysh

Next Story
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : अभिषेक-ज्योती जोडीला सुवर्ण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी