पीटीआय, मुंबई : यष्टीरक्षक-फलंदाज हार्दिक तामोरेने संधीचे सोने करीत बुधवारी ११५ धावांची शानदार खेळी साकारली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य लढतीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला ३९३ धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात, उत्तर प्रदेशची २ बाद २५ अशी केविलवाणी अवस्था झाली. धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांनी हे बळी मिळवले. खेळ थांबला, तेव्हा सलामीवीर माधव कौशिक आणि कर्णधार करण शर्मा अनुक्रमे ११ आणि १० धावांवर खेळत होते. उत्तर प्रदेशचा संघ अजून ३६८ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्याचा पहिला दिवस मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या शतकाने गाजवला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक साकारले; परंतु दुसऱ्या दिवसावर हार्दिकने छाप पाडली. अनुभवी यष्टीरक्षक आदित्य तरेला दुखापत झाल्यामुळे हार्दिकला संघात स्थान मिळाले; पण हार्दिकने २३३ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकारासह आपले दुसरे शतक साकारले. अष्टपैलू शम्स मुलानीच्या (५०) साथीने त्याने सहाव्या गडय़ासाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. करणने ही जोडी फोडली. नंतर हार्दिकने तनुषच्या (२२) साथीने सातव्या गडय़ासाठी ४० धावांची भागीदारी केली. कोटियनचा अडसर सौरभ शर्माने दूर केला. मग धवल (०), तुषार देशपांडे (१) यांनी निराशा केली. हार्दिक सर्वात शेवटी बाद झाला. उत्तर प्रदेशकडून करणने ४७ धावांत ४ बळी घेतले, तर सौरभ कुमारने १०७ धावांत ३ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

  •   मुंबई (पहिला डाव) : १४०.४ षटकांत सर्व बाद ३९३ (हार्दिक तामोरे ११५, यशस्वी जैस्वाल १००, शम्स मुलानी ५०; करण शर्मा ४/४६, सौरभ कुमार ३/१०७)
  •   उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १२ षटकांत २ बाद २५ (माधव कौशिक खेळत आहे ११; तुषार देशपांडे १/१०)