Ranji Trophy 2026-27: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, भारतीय संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना देखील ही स्पर्धा खेळणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालसारखे स्टार खेळाडू मैदानात उतरले होते. येत्या काही दिवसांत हे फलंदाज न्यूझलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहेत. त्याआधी रणजी ट्रॉफी स्पर्धा या फलंदाजांसाठी सरावासाठी उत्तम पर्याय आहे. पण या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
मुंबई आणि चंदिगड यांच्यातील रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. यशस्वी जैस्वाल मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण तो खातं देखील उघडू शकलेला नाही. १३ चेंडू खेळून तो शून्यावर माघारी परतला. यशस्वीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं, पण त्याला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता रणजी ट्रॉफीतही त्याने फ्लॉप सुरुवात केली आहे.
केएल राहुलचा फ्लॉप शो
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुल कर्नाटककडून खेळण्यासाठी मैदानात उतरला. पण तो देखील अवघ्या ४ धावा करून माघारी परतला. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात त्याने ८२ धावांची तुफानी खेळी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत केएल राहुलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे रणजी ट्रॉफीत तो चांगली सुरुवात करणार असं वाटलं होतं. पण असं काही झालं नाही.
रोहित शर्माने घेतल्या ५ विकेट्स
रणजी ट्रॉफीतील पहिल्या दिवस रोहित शर्माच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या जम्मू – काश्मीर विरुद्ध मध्यप्रदेश सामन्यात जम्मू – काश्मीर संघाचा गोलंदाज रोहित शर्माने दमदार गोलंदाजी केली. रोहितने हर्ष गवली, हिमांशू मंत्री, चंचल राठोड, अथर्व महाजन आणि शुभम शर्मा अशा ५ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं.
