KL Rahul Wicket: रणजी ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. जेतेपदासाठी कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच हा सामना जिंकण्यासाठी जम्मू-काश्मीर संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना जम्मू-काश्मीर संघाने ५८४ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले आहेत. दरम्यान संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला बाद करण्यासाठी आकिब नबीने भन्नाट चेंडू टाकला. या चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनुभवी फलंदाज अंतिम सामन्यात फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसून आला. या सामन्यात जम्मू-काश्मीर संघाकडून पहिली स्पेल टाकण्यासाठी आलेल्या आकिब नबीने आपल्या घातक गोलंदाजीने केएल राहुल आणि मयांक अगरवाल यांना बांधून ठेवण्याचं काम केलं. त्याने सुरूवातीला गोलंदाजी करताना ४ षटकात अवघ्या ४ धावा खर्च केल्या आणि २ निर्धाव षटकं टाकली. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करताना त्याने केएल राहुलला बाद केलं. दुसऱ्या स्पेलमधील पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने किपरच्या हातून झेलबाद करून माघारी धाडलं. जोरदार अपील केल्यानंतर अंपायरने त्याला नॉटआऊट घोषित केलं होतं. पण रिव्ह्यू घेतला असता,त्याला बाद घोषित करण्यात आलं.
जम्मू-काश्मीरने उभारला धावांचा डोंगर
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना जम्मू-काश्मीरने संघाने ५८४ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. पहिल्या डावात फलंदाजी करताना फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. जम्मू-काश्मीरकडून फलंदाजी करताना शुभम पुंडीर ने २४७ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची खेळी केली. तर एकूण ५ फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली.यामेर हसनने ८८, सलिल लोत्राने ७२, कन्हैया वाधवन आणि पारस डोगराने ७० धावांची खेळी केली. तर अब्दुल समदने ६१ धावा केल्या.
जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघाकडून मयांक अगरवाल १३० धावांवर नाबाद आहे. तर केएल राहुल अवघ्या १३ धावा करून माघारी परतला. कर्णधार देवदत्त पडिक्कल अवघ्या ११ धावा करत माघारी परतला. करूण नायर शून्यावर माघारी परतला. तर स्मरन रवीचंद्रण देखील शून्यावर माघारी परतला. श्रेयस गोपालने २७ धावांचे योगदान दिले. तर कृतिक कृष्णा २७ धावांवर नाबाद आहे. कर्नाटक संघाने आतापर्यंत ५ गडी बाद २२० धावा केल्या आहेत.
