बंगळुरु :दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त २४८ धावाच उभारता आल्या. मध्य प्रदेशच्या गोलंदाजांच्या फळीने मुंबईच्या तारांकित फलंदाजांवर अंकुश ठेवला. यशस्वी जैस्वालची ७८ धावांची (१६३ चेंडू) खेळी हे मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.

मुंबईकडून कर्णधार पृथ्वी शॉ (४७ धावा) आणि यशस्वीने ८७ धावांची दमदार सलामी दिली. मात्र त्यानंतर साथ न मिळणाऱ्या खेळपट्टीवर अन्य फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. मुंबईला पहिल्या डावात किमान ४०० धावांचा टप्पा उभारण्याची जबाबदारी आता यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा खात्यावर असणाऱ्या सर्फराज खानवर आहे. पहिल्या दिवसअखेर सर्फराज (१६३ चेंडूंत ४०* धावा) आणि शम्स मुलानी (४३ चेंडूंत १२* धावा) मैदानावर होते.

मध्य प्रदेशकडून डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेयाने एका बाजूने अथक ३१ षटके टाकली आणि ९१ धावांत एक बळी मिळवला. वेगवान गोलंदाज गौरव यादव (२३-५-६८-०) अपयशी ठरला. परंतु वेगवान गोलंदाज अनुभव अगरवाल (१९-३-५६-२) आणि ऑफ-स्पिनर सारांश जैन (१७-२-३१-२) यांनी अप्रतिम गोलंदाजी करीत मुंबईला हादरे दिले.

सकाळच्या सत्रात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पृथ्वी आणि यशस्वीने पहिल्या तासाभराच्या खेळात मध्य प्रदेशच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केले. कार्तिकेयापासून गोलंदाजीला प्रारंभ करण्याची रणनीती मध्य प्रदेशसाठी धोकादायक ठरली. यशस्वीने त्याला लाँग-ऑनला, तर पृथ्वीने लाँग-ऑफला षटकार खेचला. याशिवाय मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर पृथ्वीने पाच आणि यशस्वीने सात चौकार मारले. मध्य प्रदेशला उपाहाराआधी काही मिनिटांपूर्वी पहिले यश मिळाले. अर्धशतकाच्या उंबरठय़ावरील पृथ्वीचा अगरवालने त्रिफळा उडवला. मग कार्तिकेयाने अरमान जाफरला (२६) फार काळ टिकू दिले नाही. मिड-विकेटला

यश दुबेने त्याचा सूर मारून झेल टिपला.

दुसऱ्या सत्रात खेळपट्टी धिमी होत गेली. त्याचा फटका सुवेद पारकरला (१८) बसला. जैनच्या गोलंदाजीवर कर्णधार आदित्य श्रीवास्तवने त्याचा सोपा झेल घेतला. मग हंगामातील चौथ्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशस्वीला अगरवालने गलीमध्ये दुबेकरवी झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक तामोरेचा (२४) अडथळा जैनने दूर केला. पहिल्या स्लिपमध्ये रजत पाटीदारने त्याचा अप्रतिम झेल घेतला. उत्तरार्धात सर्फराज आणि मुलानीने १५ षटके संयमाने खेळून काढली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ९० षटकांत ५ बाद २४८ (यशस्वी जैस्वाल ७८, पृथ्वी शॉ ४७, सर्फराज खान खेळत आहे ४०; सारांश जैन २/३१, अनुभव अगरवाल २/५६)