पहिल्या फळीतील फलंदाज जी.चिरंजीवी याने केलेल्या झुंजार ८५ धावांमुळेच आंध्र प्रदेशला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना रविवारी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले. कडापा (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळविले. आंध्रला एक गुण मिळाला.
पहिल्या डावात १२३ धावांनी पिछाडीवर असलेल्या आंध्रने १ बाद २७ धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. त्यांचा डाव झटपट गुंडाळून महाराष्ट्र निर्णायक विजय मिळविणार की नाही हीच उत्सुकता शेवटच्या दिवसाबाबत होती. आंध्र प्रदेशकडून दुसऱ्या डावात मोठी भागीदारी झाली नाही तरीही त्यांच्या खेळाडूंनी चिकाटीने खेळ करीत महाराष्ट्राला निर्णायक विजयापासून वंचित ठेवले. त्याचे श्रेय चिरंजीवी याच्या जिगरबाज खेळास द्यावे लागेल. त्याने २०९ चेंडूंमध्ये ८५ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १२ चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. त्याचे सहकारी ए.जी.प्रदीप (२५), एम.सुरेश (नाबाद ३८) व के.हरीश (नाबाद १६) यांनीही चांगली झुंज दिली.
आंध्र प्रदेशने ९० षटकांमध्ये ७ बाद २३७ धावा केल्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णीत राहिल्याचे मान्य केले व खेळ थांबविला. महाराष्ट्राकडून अनुपम सकलेचा याने ५६ धावांमध्ये तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक- आंध्र प्रदेश ३१७ व ७ बाद २३७ (जी.चिरंजीवी ८५, ए.जी.प्रदीप २५, एम.सुरेश नाबाद ३८, के.हरीश नाबाद १६, अनुपम सकलेचा ३/५६, निकित धुमाळ १/६१, अंकित बावणे १/२५, भरत सोळंकी १/४९).