अनुपम, चिराग यांच्या गोलंदाजीमुळे छत्तीसगडचा पहिला डाव २८६ धावांत आटोपला

पुणे : मध्यमगती गोलंदाज अनुपम संकलेचा (३/७०) आणि फिरकीपटू चिराग खुराना (३/६४) यांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील छत्तीसगडविरुद्धच्या ‘क’ गटातील सामन्यात पहिल्या डावात ३ धावांनी निसटती आघाडी मिळवली. तिसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात १ बाद ४२ धावा केल्या असून आता त्यांच्या खात्यात एकूण ४२ धावांची आघाडी आहे.

महाराष्ट्राने केलेल्या पहिल्या डावातील २८९ धावांच्या प्रत्युत्तरात गुरुवारच्या ३ बाद १३१ धावांवरून पुढे खेळताना छत्तीसगडचा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. छत्तीसगडचा कर्णधार हरप्रीत सिंग (९०) आणि अमनदीप खरे (४०) यांची झुंज थोडक्यात अपयशी ठरली. अमनदीप बाद झाल्यावर ४ बाद १९२ धावांवरून छत्तीसगडचा डाव पुढील ९४ धावांत घसरला. मुकेश चौधरीने दोन बळी मिळवून प्रत्येकी तीन बळी मिळवणाऱ्या अनुपम, चिराग यांना योग्य साथ दिली.

दुसऱ्या डावात महाराष्ट्राने सलामीवीर मोर्तझा ट्रंकवालाला (९) लवकर गमावले. परंतु पहिल्या डावातील शतकवीर ऋतुराज गायकवाडने (खेळत आहे २८) नाइट वॉचमन सत्यजीत बच्छावच्या (खेळत आहे १) साथीने उर्वरित षटके खेळून काढली. स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावणारा महाराष्ट्राचा संघ अखेरच्या दिवशी विजयाच्या निर्धाराने लढणार की पहिल्या डावातील आघाडीवर समाधान मानणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

* महाराष्ट्र (पहिला डाव) : २८९

*  छत्तीसगड (पहिला डाव) : १११ षटकांत सर्व बाद २८६ (हरप्रीत सिंग ९०, अजय मंडल ३५; अनुपम संकलेचा ३/७०, चिराग खुराना ३/६४)

* महाराष्ट्र (दुसरा डाव) : १३ षटकांत १ बाद ३९ (ऋतुराज गायकवाड खेळत आहे २८, मोर्तझा ट्रंकवाला ९; सुमित रुईकर १/९)

१३ ३७ वर्षीय अनुपम संकलेचाने तीन सामन्यांतील पाच डावात आतापर्यंत सर्वाधिक १३ बळी मिळवले आहेत.