वृत्तसंस्था, हैदराबाद

कसोटी संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेला सर्फराज खान (१६४ चेंडूंत नाबाद १४२) आणि कर्णधार सिद्धेश लाड (१७९ चेंडूंत १०४) यांच्या दमदार शतकांच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारपासून सुरू झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद ३३२ धावांची मजल मारली. हैदराबाद येथे सुरू झालेल्या या सामन्यात यजमानांचा कर्णधार मोहम्मद सिराजने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईसाठी अखिल हेरवाडकर (७१ चेंडूंत २७) आणि यष्टिरक्षक-फलंदाज आकाश आनंद (७७ चेंडूंत ३५) यांनी संयमी सुरुवात केली.

त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावताना हैदराबादच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. मात्र, फिरकीपटू रोहित रायडूने हेरवाडकरला बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ कसोटीपटू सिराजने आकाश आनंदचा अडसर दूर केला. मुशीर खानला (११) फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे एकवेळ बिनबाद ६० अशा सुस्थितीत असलेल्या मुंबईची ३ बाद ८२ अशी अवस्था झाली. येथून लाड आणि सर्फराज यांच्या जोडीने मुंबईला सावरून घेतले. सर्फराजने नैसर्गिक आक्रमक शैलीतच फलंदाजी करताना धावफलक हलता ठेवला. यंदा मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धांत चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्फराजने रणजी स्पर्धेतही लय कायम राखली. त्याने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील १७वे शतक १२० चेंडूंत पूर्ण केले.

त्याने आणि लाडने २४९ धावांची भागीदारी रचताना मुंबईला भक्कम स्थितीत पोहोचवले. जायबंदी शार्दूल ठाकूरच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या लाडनेही आपली जबाबदारी ओळखून फलंदाजी केली. त्याने प्रथमश्रेणीतील १४वे शतक केले. अखेरची काही षटके शिल्लक असताना लाड बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावा केल्या. दिवसअखेर सर्फराज ११ चौकार आणि ५ षटकारांसह १४२ धावा करून नाबाद होता. त्याच्यासह हिमांशू सिंह (नाबाद ०) खेळपट्टीवर होता.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : ८७ षटकांत ४ बाद ३३२ (सर्फराज खान नाबाद १४२, सिद्धेश लाड १०४, आकाश आनंद ३५; रोहित रायडू २/६६, मोहम्मद सिराज १/७७)

शुभमन गिल अपयशी राजकोट : भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल रणजी पुनरागमनात अपयशी ठरला. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात अवघे दोन चेंडू खेळून तो खातेही न उघडता बाद झाला. त्याला डावखुरा फिरकीपटू पार्थ भुतने माघारी धाडले. राजकोट येथे सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्याच दिवशी तब्बल २३ गडी बाद झाले. सौराष्ट्रचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आल्यावर पंजाबलाही अवघ्या १३९ धावाच करता आल्या. पहिल्या दिवसअखेर सौराष्ट्रची दुसऱ्या डावात ३ बाद २४ अशी स्थिती होती. त्यांच्याकडे ५७ धावांची आघाडी होती. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने (७) फलंदाजीत निराशा केली, पण गोलंदाजीत दोन गडी बाद केले.