Ranji Trophy 2024-25 Shreyas Iyer hits century : भारतीय कसोटी संघातून बाहेर असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने शनिवारी (१९ ऑक्टोबर) तीन वर्षानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावले. त्याने मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील दुसऱ्या फेरीतील रणजी करंडक सामन्यात तीन वर्षांनंतर प्रथम श्रेणीतील शतकाचा दुष्काळ संपवला. कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मुंबईसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अय्यरने युवा सलामीवीर फलंदाज आयुष म्हात्रेसह मुंबई संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या दिवशी २०० धावांची भक्कम भागीदारी करत मुंबईला ३०० धावांच्या पुढे नेले.

श्रेयस अय्यरने १३१ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. शतकाने अय्यरचा दीर्घकाळचा दुष्काळ संपवला, जो २०२४ च्या सुरुवातीला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापासून भारताच्या कसोटी सेटअपमधून बाहेर आहे. २९ वर्षीय अय्यरने मागील प्रथम श्रेणीतील शतक नोव्हेंबर २०२१ मध्ये कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झळकावले होते. अय्यरने महाराष्ट्राविरुद्धच्या डावात ६००० प्रथम श्रेणी धावाही पूर्ण केल्या आहेत. आयुष म्हात्रे १७६ धावा करून बाद झाला.

यंदा देशांतर्गत क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला अय्यरची कामगिरी खराब राहिली होती –

देशांतर्गत क्रिकेट हंगाम २०२४-२५ सुरू झाल्यापासून अय्यरची कामगिरी खराब राहिली होती. दुलीप ट्रॉफीमध्ये अय्यरने सहा डावांत दोन अर्धशतके आणि तितक्याच शून्यांसह केवळ १५४ धावा केल्या होत्या. मुंबईसाठी इराणी कप सामन्यात अय्यरने दोन डावात ५७ आणि ८ धावा केल्या. अय्यरने गेल्या आठवड्यात बडोद्यात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत शून्यावर बाद झाला होता. अय्यर आणि भारतीय यष्टीरक्षक इशान किशन यांना २०२४ च्या सुरुवातीला बीसीसीआयने केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले होते, जेव्हा त्यांनी देशांतर्गत स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने भारताच्या दिग्गज कर्णधाराचा मोडला रेकॉर्ड, बंगळुरु कसोटीत केली ‘या’ खास विक्रमाची नोंद

श्रेयस तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता –

मुंबईसाठी रणजी सामन्यांपासून दूर राहण्याचे कारण म्हणून अय्यरने पाठ आणि कंबरदुखीचे कारण सांगितले असले तरी, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान प्रमुख नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय वैद्यकीय पथकाला त्याच्या फिटनेसमध्ये कोणतीही समस्या आढळली नव्हती. अय्यर गेल्या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली होती, जिथे त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह ४६८ धावा केल्या होत्या. मात्र, कसोटी सामन्यांमध्ये तो संघर्ष करत होता. त्यानंतर त्याला बराच वेळ देण्यात आला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या मध्यभागी त्याला संघातून वगळण्यात आले.

Story img Loader