वृत्तसंस्था, राजकोट
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वांत प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला आज, गुरुवारपासून प्रारंभ होणार असून यावेळी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, तारांकित फलंदाज केएल राहुल, तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.
गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडकडून १-२ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर विश्रांती घेण्यापेक्षा गिलने थेट रणजी सामन्यात सहभाग नोंदवणे पसंत केले आहे. तो पंजाबचे प्रतिनिधित्व करणार असून ‘ब’ गटातील सामन्यात त्यांच्यासमोर आघाडीचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश असलेल्या सौराष्ट्र संघाचे आव्हान असेल. बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा ठरणार आहे.
दुसरीकडे, केएल राहुलमुळे कर्नाटक संघाला बळकटी मिळणार आहे. ‘ब’ गटात कर्नाटकची मध्य प्रदेशशी गाठ पडणार आहे. राहुल गेल्या काही काळापासून चांगल्या लयीत असून रणजी पुनरागमनात मोठी खेळी करण्याचा त्याचा मानस असेल.
दोन सामने शिल्लक
रणजी स्पर्धा दोन महिन्यांनंतर आता पुन्हा सुरू होत असून साखळी फेरीत सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. त्यानंतर सहा फेब्रुवारीपासून बाद फेरीला सुरुवात होईल. साखळी फेरीअंती चारही ‘एलिट’ गटांतील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वच सामने चुरशीचे होणे अपेक्षित आहे.
मुंबईसमोर सिराजच्या हैदराबादचे आव्हान
हैदराबाद : ‘ड’ गटात अग्रस्थानी असलेल्या मुंबईसमोर आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या साखळी सामन्यात मोहम्मद सिराजच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाचे आव्हान असणार आहे. सिराजला प्रथमच हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळणार आहे. त्यातच हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर असल्याने ते मुंबईला कडवी झुंज देणे अपेक्षित आहे. मुंबईच्या संघाने पहिल्या पाचपैकी तीन सामन्यांत विजय मिळवले, तर दोन सामने अनिर्णित राखले. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईचा संघ भक्कम स्थितीत आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरच मुंबईचे नेतृत्व करणार असून त्यांना अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेविना खेळावे लागले. तो उर्वरित स्पर्धेसाठी उपलब्ध नाही. तसेच अष्टपैलू तनुष कोटियन दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.
महाराष्ट्र, विदर्भाला बाद फेरीची संधी
नवी दिल्ली : रणजी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी दावेदारी भक्कम करण्याची महाराष्ट्र आणि विदर्भ संघांना उत्तम संधी आहे. पाच सामन्यांनंतर गतविजेता विदर्भ संघ ‘अ’ गटात २५ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यांची आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यात आंध्रशी गाठ पडेल. आंध्रचा संघ २२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्यातील विजेत्या संघाचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होऊ शकेल. ‘ब’ गटात महाराष्ट्राच्या संघानेही चांगली कामगिरी केली आहे. पाच सामन्यांत १८ गुणांसह महाराष्ट्र गटात दुसऱ्या स्थानी आहे. त्यांच्यासमोर गोव्याचे आव्हान असेल. स्पर्धेत आगेकूच करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी हा सामना निर्णायक ठरू शकेल.
