पहिल्या दिवशी मुंबईचा खुर्दा उडवल्यावर दुसऱ्या दिवशी बाबा इंद्रजीतचे शतक आणि विजय शंकरच्या ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने पहिल्या डावात ४१७ धावांचा डोंगर उभारला. तामिळनाडूने पहिल्या डावात आघाडी घेतली असून, दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा संघ २६४ धावांनी पिछाडीवर आहे.
४ बाद १३६ वरून पुढे खेळताना शंकरने सावध खेळ करत अर्धशतक पूर्ण केले, पण दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ लाभत नव्हती. पण शंकरने एकाकी झुंज देत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली. शंकर बाद झाला तेव्हा तामिळनाडूची ७ बाद २५२ अशी अवस्था होती. यावेळी मुंबईचा संघ तामिळनाडूला जास्त धावा करू देणार नाही असे वाटत होते. पण इंद्रजीतने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०१ धावांची खेळी साकारत संघाला ४१७ धावांचा डोंगर उभारून दिला. मुंबईकडून यावेळी अक्षय गिरपने सर्वाधिक चार बळी मिळवले.
तामिळनाडूच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर मुंबईची १ बाद १२ अशी अवस्था आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : १४१ आणि १२.४ षटकांत १ बाद १२ (आदित्य तरे खेळत आहे ६, राहिल शाह १/६).
तामिळनाडू : १२२ षटकांमध्ये सर्व बाद ४१७. (बाबा इंद्रजीत १०१, विशाल शंकर ९५; अक्षय गिरप ४/८७).