टी२० वर्ल्डकप स्पर्धेत, सुपर८ फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघावर दिमाखदार विजय मिळवला. अर्धशतकी खेळी करणारा डेव्हिड मिलर या विजयाचा शिल्पकार ठरला. मिलरबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरने एक व्हीडिओ केला. गंमतीशीर अशा स्वरुपाचा हा व्हीडिओ होता. मात्र हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर इन्फ्लुएन्सरला बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. बॉडी शेमिंग अर्थात तिच्या शरीराला उद्देशून आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी होऊ लागली. या प्रकाराने व्यथित झालेल्या तिने फेसबुकवरून हे रील डिलिट केलं आहे.
आयसीसीने टी२० वर्ल्डकपच्या निमित्ताने अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सना ताफ्यात समाविष्ट केलं आहे. सामन्याआधी, सामन्यानंतर ही मंडळी व्हीडिओ तयार करतात. काहीजण माजी खेळाडूंच्या मुलाखती घेतात. आरजे प्रिन्सी पारीख या इन्फ्ल्युएन्सरने हा सामना संपल्यानंतर डेव्हिड मिलरबरोबर एक व्हीडिओ केला.
डेव्हिड मिलर, कमाल खेळाडू!असं या व्हीडिओला कॅप्शन होतं. व्हीडिओत इन्फ्ल्युएन्सर मिलरभोवती फेरी मारताना दिसते. मिलर, आपण मित्र होतो असं गंमतीत ती म्हणताना दिसते. मिलरने भारताला हरवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे ती असं म्हणत होती.
हे रीळ शेअर केल्यानंतर बलात्काराच्या धमक्या आल्या तसंच बॉडी शेमिंग करण्यात आलं असं या इन्फ्लुएन्सरचं म्हणणं आहे. या प्रकाराने संतापलेल्या तिने फेसबुकवरून रीळ डिलिट केलं मात्र तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे रील उपलब्ध आहे. लवकरच यासंदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याचं तिने सांगितलं. प्रचंड अशा ट्रोलिंगमुळे मला आता गायब व्हावंसं वाटत आहे असं तिने संतापून म्हटलं आहे. कमेंट्स मध्ये मला धमक्या देण्यात आल्या. अतिशय हीन भाषेत टीका करण्यात आली. ही ग्राफिक्स मी सहन करू शकत नाही. अनेकांना मी ब्लॉक केलं आहे. मला अशा पद्धतीने त्रास देणाऱ्यांची नावं मी प्रसिद्ध करणार आहे.
अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने १८७ धावांची मजल मारली. डेव्हिड मिलरने ३५ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. डेवाल्ड ब्रेव्हिसने ४५ तर ट्रिस्टन स्टब्जने ४४ धावा करत मिलरला चांगली साथ दिली. भारतातर्फे जसप्रीत बुमराहने ३ तर अर्शदीप सिंगने २ विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. शिवम दुबेने ४२ धावांची खेळी करत थोडा प्रतिकार केला. दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मार्को यान्सनने ४ तर केशव महाराजने ३ विकेट्स घेतल्या. मिलरलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आयपीएल स्पर्धेत खेळण्याच्या निमित्ताने भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी असणाऱ्या मिलरने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

