अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू रशीद खानच्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खान अफगाणिस्तानमध्ये चक्क बुलेट प्रुफ कारमधून फिरतो. केविन पीटरसनला दिलेल्या मुलाखतीत रशीद खानने खुलासा केला की, तालिबानचं शासन असलेल्या अफगाणिस्तानात त्याला सुरक्षित वाटत नाही आणि त्यासाठी तो काय करतो हेही त्याने सांगितलं.
रशीद खानने खुलासा केला की तो त्याच्या सुरक्षेसाठी अफगाणिस्तानात बुलेटप्रूफ कारने प्रवास करतो. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजाकडून हे ऐकून केविन पीटरसनलाही धक्का बसला. पण, रशीद खानने स्पष्ट केलं की हे आश्चर्यकारक नाही, कारण त्याच्या देशात ही सामन्य गोष्ट आहे. तर रशीदचं उत्तर ऐकून केविन पीटरसन मात्र चकित झाला.
केविन पीटरसनने रशीदबरोबर संभाषणाचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये रशीद खान अफगाणिस्तानच्या सध्याच्या वातावरणात तो कसं आयुष्य जगतो हे सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन रशीद खानला विचारतो की अफगाणिस्तानातील जीवन कसं आहे? तो साधारणपेणे रस्त्यावर चालू शकतो का? रशीद खानच्या उत्तराने पीटरसन चकित झाला.
पीटरसन व रशीदचा संवाद
केविन पीटरसन: अफगाणिस्तानमधील तुझं जीवन कसं आहे? रस्त्यांवर तुम्ही मोकळेपणाने फिरू शकता का?
रशीद खान: शक्यच नाही. मी अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर साध्या कारमधून पण फिरू शकत नाही. माझ्याकडे बुलेटप्रूफ कार आहे.
पीटरसन: काय? तुझ्याकडे काबूलमध्ये बुलेटप्रूफ कार आहे? का बुलेटप्रुफ कार का आहे?
रशीद खान: हो बुलेटप्रुफ कारची मला गरज आहे. माझ्या सुरक्षेसाठी मी ती वापरतो.
पीटरसन: पण तुला कोणी गोळी घालणार नाही ना तिथे?
रशीद खान: नाही मला कोणी गोळी घालणार नाही. पण कदाचित मी चुकीच्या वेळी एखाद्या चुकीच्या ठिकाणी असू शकतो, ज्याचा अंदाजही नसेल. त्यामुळे हो. काही वेळेस लोक थेट कार उघडायला येतात, त्यामुळे ती सुरक्षित वाटते. अफगाणिस्तानात हे सामान्य आहे आणि बऱ्याच लोकांकडे आहे.
अफगाणिस्तानचा उत्कृष्ट व दिग्गज क्रिकेटपटू म्हणून रशीद खानला ओळखलं जातं. त्याच्या यशाने अफगाणिस्तानात क्रिकेटचं बीज रोवलं आहे. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, रशीद खानने अफगाणिस्तानसाठी सहा कसोटी, ११७ एकदिवसीय आणि १०८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याला जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो.
